अमळनेर, जि.जळगाव : येथील पालिकेने शहरात जाहिरात फलक, होर्डिंग्ज आणि डिजिटल बॅनर लावण्याची ३५ ठिकाणे निश्चित केली असून, इतरत्र जाहिरात लावल्यास पालिकेतर्फे जाहिरात लावणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.शहरात विविध भागात जाहिरात फलक, होर्डिंग्ज आणि डिजिटल बॅनर्स लावले जात असतात. यातून मोठ्या प्रमाणात शहर विद्रूपीकरण होत असते. हा विषय आता पालिकेने गांभीर्याने घेतला असून जाहिराती, बॅनर्स लावण्याची ३५ ठिकाणे निश्चित केली आहेत....तर कारवाई केली जाणारइतरत्र जाहिरात लावल्यास महाराष्ट्र शासन मालमत्ता विद्रूपन कायदा २००० तसेच महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ अन्वये फलक तयार करणारे व करून घेणारे यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.पालिकेने सन २०१८-१९ साठी जाहिरात कर वसुलीचा मक्ता दिलेला आहे. अमळनेर परिक्षेत्रात उपरोक्त जागी जाहिरात लावण्याची परवानगी संबंधित संस्थेमार्फत घ्यावी लागणार आहे. निश्चित केलेल्या ३५ जागीच आपले जाहिरात होर्डिंग, फलक आणि डिजिटल बॅनर संबंधित संस्थेमार्फत लावता येणार आहेत. यासंदर्भातील नियमांचे उल्लंघन कोणी केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पालिकेतर्फे देण्यात आला आहे.
होर्डिंग्ज लावण्याची ठिकाणे निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 11:56 PM