लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मुक्ताईनगरात उभ्या राहणाऱ्या ऑक्सिजन प्रकल्पाचे काम दिलेल्या मुदतीत न झाल्याने एसएनपी इक्विपमेंट या एजन्सीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. काम लवकर न झाल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी दिली.
जिल्हाभरात विविध ठिकाणी ऑक्सिजन प्रकल्पांची कामे सुरू आहेत. अनेक ठिकाणची कामे ही पूर्णत्वास आली आहेत; मात्र, विद्युत जोडणीअभावी, ट्रान्समीटरअभावी हे प्रकल्प रखडले आहेत. त्यातच आता तिसऱ्या लाटेचा इशारा असल्याने हे प्रकल्प लवकर पूर्ण होणे अपेक्षित आहे. अशातच मुक्ताईनगर येथील प्रकल्पाला सव्वा महिन्यांचा अवधी असताना तीन महिने उलटूनही हे काम झालेले नसल्याने या ठिकाणच्या एजन्सीला नोटीस देण्यात आली आहे.
मोहाडीच्या दोन टँकला महिन्याचा अवधी
मोहाडी येथे प्रत्येकी २० केएल क्षमतेचे दोन टँक बसविण्यात येणार आहे. या टँकला अद्याप महिनाभराचा अवधी आहे. या ठिकाणचा ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प पूर्ण झाला आहे. यासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पीएम केअरकडून एक प्रकल्प पूर्ण झाला असून, दुसरा प्रकल्प रद्द करून या ठिकाणी अतिरिक्त टँक बसविण्यात येणार आहे.