ऑनलाईन लोकमत
अमळनेर,दि.25- पश्चिम रेल्वेच्या ताप्ती सेक्शनवर दुहेरीकरणाचे काम सुरू असल्याने, गुरुवारी सकाळची पॅसेंजर, अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेस उशिरा आल्याने प्रवाशांचे मोठय़ा प्रमाणात हाल झाले. नवजीवन एक्स्प्रेसही जवळपास एक तास अमळनेर स्थानकावर थांबवून ठेवण्यात आली होती. दरम्यान सकाळची व सायंकाळची पॅसेंजर रद्द केल्याचा सर्वाधिक फटका अप-डाऊन करणा:यांना बसणार आहे.
पश्चिम रेल्वे मार्गाच्या उधना-जळगाव मार्गावरील होळ ते अमळनेर दरम्यान रेल्वे दुहेरीकरणाचे काम सुरू असल्याने, रेल्वे प्रशासनाने 25 मे ते 11 जून दरम्यान सकाळची 59013 सुरत-भुसावळ व सायंकाळची 59014 भुसावळ-सुरत पॅसेंजर, तसेच अमरावती-सुरत, सुरत अमरावती सुपरफास्ट पॅसेंजर काही दिवस रद्द केली केली आहे.
अमळनेर, टाकरखेडा, भोणे या परिसरातून जवळपास दीड ते दोन हजार नागरिक नोकरी, मजुरीनिमित्त जळगावला जात असतात. गाडय़ा रद्द झाल्याने अनेकांना आज स्थानकावर आल्यावरच समजले.
प्रवाशांची प्रचंड गर्दी
नरडाणाजवळ रेल्वेचे काम सुरू असल्याने, सकाळी भुसावळला जाणारी पॅसेंजर उशिरा येणार असल्याने अनेक प्रवाशी स्थानकावर थांबून होते. अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसलाही उशीर झाला. तर अहमदाबादकडे जाणारी नवजीवन एक्स्प्रेसही बराचवेळ अमळनेर स्थानकावर थांबवून ठेवण्यात आली होती. त्यामुळे स्थानकावर प्रवाशांची मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली होती.
अन्य गाडय़ा सुरू
रेल्वे दुहेरीकरणाचे काम सुरू असल्याने,फक्त पॅसेंजर गाडी तसेच अमरावती पॅसेजरच रद्द केली आहे. उर्वरित एक्स्प्रेस एवढेच नाही तर सकाळची भुसावळ-सुरत व सायंकाळची भुसावळ सुरत या गाडय़ा सुरू आहेत. इतर गाडय़ा सुरू आहेत तर मग सकाळची व सायंकाळचीच पॅसेंजर का रद्द करण्यात आली असा प्रवाशांचा सवाल आहे.