लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : विष प्राशन केलेल्या आव्हाणे येथील पंधरा वर्षीय मुलीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारास विलंब झाला. तीन दिवसांनी या मुलीला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. दुपारी दीड वाजता रक्ततपासणीचे अहवाल येऊनही रात्री साडेनऊ वाजेपर्यंत कोणत्याच डॉक्टरांनी बघितलेसुद्धा नाही, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
आव्हाणे येथील एका पंधरा वर्षीय मुलीने विष प्राशन केले होते. या मुलीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तीन दिवसांपूर्वी सामान्य कक्षात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी रक्ताच्या काही तपासण्या करायला सांगितले होते. त्या तपासण्या नातेवाइकांनी तातडीने करून आणल्या. दुपारी दीड वाजता याचे रिपोर्ट आणले मात्र, तेव्हापासून एकही डॉक्टर बघायला आले नाही. रात्री साडेनऊ वाजता नियमित तपासणीला आलेल्या डॉक्टरांनी अखेर या मुलीचे रिपोर्ट बघून नंतर १४ नंबरच्या अतिदक्षता विभागात हलविले. आता या मुलीवर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.