लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात असताना, नागरिक मात्र अजूनही प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांकडे दुर्लक्ष करत आहेत. शहरातील मास्टर कॉलनीसारख्या रहिवासी भागात बुधवारी सकाळी १० वाजेच्य सुमारास मोठा बाजार भरला होता. विशेष म्हणजे या बाजारात शेकडोंच्या संख्येत नागरिक व विक्रेत्यांनी गर्दी केली होती. मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली अचानक केलेल्या कारवाईत १०० पेक्षा अधिक हॉकर्सचा माल जप्त केला. तसेच काही वेळातच संपूर्ण बाजार खाली करून, हा बाजार उठविला.
नियमाप्रमाणे कोणत्याही रहिवासी भागात बाजार भरविणे नियमबाह्य आहे. तसेच बाजार भरवित असताना, मनपाने त्या बाजाराला परवानगी देणे गरजेचे असते. मात्र, मास्टर कॉलनी भागात अनेक महिन्यांपासून दर बुधवारी हा ‘बुध बाजार’ भरत आहे. गेल्या आठवड्यात देखील मनपाच्या पथकाने या भागात जाऊन हा बाजार हटविला होता. आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही हा बाजार भरत असून, याठिकाणी येणारे विक्रेते व ग्राहक देखील कोणत्याही प्रकारचे नियम पाळत नसल्याने मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने जोरदार कारवाई केली आहे.
शेकडोंची गर्दी, ना मास्क ना सोशल डिस्टन्सिंग
मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या उपस्थितीत मनपाचे पथक याठिकाणी पोहचले असता, बाजारात शेकडोंची गर्दी आढळून आली. त्यातच या भागातील गल्ली अरुंद असल्याने दूरपर्यंत ही गर्दी पसरली होती. इतक्या मोठ्या प्रमाणात ही गर्दी होती, की ज्यामुळे पायी चालूनही मार्ग काढणे कठीण होते. त्यातच एकही विक्रेत्याने याठिकाणी मास्क घातला नव्हता. तसेच अनेक ग्राहकांनी मास्क घातला नव्हता. त्यातच ९० टक्के विक्रेते हे यावल, मलकापुर, धुळे, रावेर, फैजपूर या भागातून याठिकाणी विक्रीसाठी आले असल्याचे लक्षात आले.
मनपा कर्मचाऱ्यांशी घातली हुज्जत
मनपाचे पथक पोहचल्यानंतर हॉकर्सला दुकाने व माल काढून व्यवसाय बंद करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, विक्रेत्यांनी दुकाने सुरुच ठेवल्याने मनपाच्या पथकाने साहित्य जप्त करण्यास सुरुवात केली. यामुळे बाजारात एकच गोंधळ झाला. काही विक्रेते माल घेऊन पळ काढत होते. तर ग्राहकांनी देखील पळापळ सुरु केल्याने गोंधळात भर पडली. त्यात माल जप्त करत असताना काही विक्रेत्यांनी मनपा कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. त्यामुळे काही काळ या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता.
घरांमध्ये लपविला माल
मनपाच्या पथकाने कारवाईला सुरुवात केल्यानंतर काही विक्रेत्यांनी या भागातील काही घरांमध्ये माल लपविला. मनपाच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी घरांमध्ये जाऊन हा माल जप्त केला. यामुळे काही घर मालकांचा मनपा कर्मचाऱ्यांशी देखील वाद झाला. उपायुक्त संतोष वाहुळे यांनी सर्व बाजार उठविण्याचा सूचना दिल्या. तसेच बाजार पुन्हा थाटल्यास विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्याचाही इशारा उपायुक्तांनी दिला आहे. दुपारी १२ वाजेनंतर संपूर्ण बाजार उठविण्यात आला होता. तसेच मनपा कर्मचाऱ्यांना दुपारपर्यंत या भागातच थांबण्याचे आदेशही मनपा उपायुक्तांनी दिले होते. मात्र, दुपारनंतर याठिकाणी बाजार भरला नाही.