जळगाव : ॲन्टिजेन चाचणीची परवानगी नसताना जादा रक्कम घेऊन ही चाचणी करण्यासह उपचारासाठी ॲडव्हान्स मागणाऱ्या खासगी रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
याविषयी दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, १३ एप्रिल रोजी मारुती ओंकार माळी या रुग्णाची चाचणी व तपासणी केल्यानंतर डॉ. विवेक चौधरी यांच्या गजानन हॉस्पिटलमध्ये संबंधित रुग्णाला तीस हजार रुपये ॲडव्हान्स मागण्यात आला. रुग्णाची परिस्थिती नसल्याने त्यांनी विनवण्या केल्या तरीदेखील रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले नाही. या सोबतच या ठिकाणी परवानगी नसतानाही करण्यात आलेल्या चाचणीची अधिक रक्कम घेण्यासह इतरही उपचारासाठी जादा रक्कम वसूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच डिपॉझिट न भरल्यामुळे रुग्णावर उपचार करण्यास नकार देऊन त्याला परत पाठविण्यात आले व संबंधितास तपासणीचे बिल देण्यासाठी टाळाटाळ केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या रुग्णालयाचे ऑडिट करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कोल्हे यांनी केली आहे.
दरम्यान, या विषयी रुग्णालयाचे डॉ. विवेक चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आमच्याकडे ॲन्टिजेन तपासणी केली जात नाही व ती आम्ही केलीदेखील नाही. ज्यावेळी हा रुग्ण आला त्यावेळी आमच्याकडे एकही बेड खाली नव्हता. संबंधित रुग्णाला किडनीचा त्रास असल्याने त्यांना किडनी उपचाराच्या ठिकाणी जाण्यास सांगितले. कोणतीही जादा रक्कम वसूल केली नसून त्यांना बिलदेखील देण्यात आले असल्याचे चौधरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.