सचखंड एक्स्प्रेसला जादा डबे जोडण्याची मागणी
जळगाव : जळगावहून नागपूरकडे जाणाऱ्या सचखंड एक्स्प्रेसला गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी वाढत आहे. यामुळे जनरल बोगीमध्ये अनेक प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागत आहे. तरी रेल्वे प्रशासनाने सचखंड एक्स्प्रेसला जादा डबे जोडण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.
पती-पत्नीच्या भांडणामुळे प्रवाशांना त्रास
जळगाव : जळगाव रेल्वे स्टेशनवर पती-पत्नीमध्ये घरगुती कारणावरून जोरदार भांडण झाले. दोघांच्या या भांडणामुळे स्टेशनवर गाडीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना मानसिक त्रास सहन करावा लागला. यावेळी काही प्रवाशांनी या प्रकाराची रेल्वे पोलिसांना माहिती दिली. मात्र, पोलीस येण्याआधीच हे दाम्पत्य स्टेशनातून बाहेर पडले. पती-पत्नीच्या या भांडणाची प्रवाशांमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती.
स्टेशनवरील विश्रामगृहातील पंखे बंद
जळगाव : जळगाव रेल्वे स्टेशनवरील तिकीट खिडकी समोरील विश्रामगृहातील अनेक पंखे बंद आहेत. यामुळे प्रवाशांना उकड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी तर यातील काही पंखे बंदही करून ठेवण्यात येत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. तरी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी प्रवाशांमधून करण्यात येत आहे.
शिवाजीनगरकडील तिकीट खिडकी सुरू करण्याची मागणी
जळगाव : कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून रेल्वे प्रशासनातर्फे शिवाजीनगरकडील तिकीट खिडकी बंद करण्यात आली आहे. यामुळे शिवाजीनगरकडून येणाऱ्या प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तरी रेल्वे प्रशासनाने तातडीने शिवाजीनगरकडील तिकीट खिडकी सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.