आरक्षण खिडकी सुरू करण्याची मागणी
जळगाव : जळगाव रेल्वे स्टेशनवर शिवाजीनगरच्या बाजूनेही रेल्वे प्रशासनातर्फे आरक्षण खिडकी सुरू करण्यात आली होती. मात्र, कोरोना काळापासून ही खिडकी बंद आहे. त्यामुळे शिवाजीनगरातील नागरिकांना स्टेशनवरील मुख्य आरक्षण तिकीट खिडकीवर तिकिटे काढण्यासाठी यावे लागत आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून, रेल्वे प्रशासनाने पुन्हा येथील आरक्षण खिडकी सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.
महाराष्ट्र एक्सप्रेसला जादा डबे जोडण्याची मागणी
जळगाव : सध्या कोरोना काळात पुण्याला जाण्यासाठी महाराष्ट्र एक्सप्रेस ही एकमेव गाडी सुरू असल्यामुळे, प्रवाशांची या गाडीला मोठी गर्दी होत आहे. यामुळे इतर प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागत आहे. तरी रेल्वे प्रशासनाने या गाडीला जादा डबे जोडावे, तसेच या मार्गावर जादा गाड्याही सोडण्याची मागणी प्रवाशांतर्फे करण्यात येत आहे.
रिक्षा नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय
जळगाव : सध्या शहरात सुरू असलेल्या जनता कर्फ्यूमुळे बहुतांश खासगी रिक्षा चालकानांही व्यवसाय बंद ठेवला आहे. परिणामी बाहेरगावाहून रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांना स्टेशनवरून इतरत्र ठिकाणी जाण्यासाठी रिक्षा मिळत नसल्यामुळे, या प्रवाशांची गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे यामध्ये रात्रीच्या वेळी बाहेर गावाहून येणाऱ्या प्रवाशांची सर्वाधिक गैरसोय होत आहे.
लिफ्ट सुरू करण्याची मागणी
जळगाव : कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून स्टेशनवरील लिफ्ट बंद आहेत, यामुळे स्टेशनवर जाण्यासाठी वयोवृद्ध व दिव्यांग प्रवाशांची गैरसोय होत आहे. तरी रेल्वे प्रशासनाने बंद ठेवलेल्या लिफ्ट तातडीने सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवाशांमधून केली जात आहे. तरी वरिष्ठांच्या सूचनेनुसार या लिफ्ट सुरू करण्यात येणार असल्याचे स्थानिक रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.