जुवार्डी गावासाठी दोन अंगणवाड्यांचे बांधकाम मंजूर व्हावे, म्हणून ग्रामस्थ व ग्रामपंचायत प्रशासनामार्फत मागील सात ते आठ वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. या मागणीसाठी ग्रामस्थांनी व गावातील तरुणांनी दोनवेळा उपोषणही केले आहे.
तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी जिल्हा परिषदेला जुवार्डी गावाच्या अंगणवाडी बांधकामाचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. दोन वर्षांपूर्वी एक अंगणवाडी बांधकाम मंजूरही झाले ; परंतु संबंधित संस्थेने हे काम केले नसल्यामुळे निधी खर्च करण्याची मुदत संपून निधी परत गेला. सरपंच सुनीता ठाकरे व उपसरपंच पी. ए. पाटील यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना अंगणवाडी बांधकाम मंजूर करण्यासाठी पत्र लिहून मागणी केली असता भडगाव पंचायत समितीच्या एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्यामार्फत प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हा बाल विकास अधिकारी यांनी कळवले होते. त्यानुसार प्रस्ताव सादर करूनही जिल्हा परिषदेकडून या मागणीची दखल घेतली गेलेली नाही.
जुवार्डी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रा. राजेंद्र पाटील मागील पाच वर्षांपासून मुख्यमंत्री कार्यालय, महिला व बाल विकास मंत्री, सचिव, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन अधिकारी यांना इमेल व ‘आपले सरकार’ वेबपोर्टलच्या माध्यमातून तक्रारी लिहून पाठपुरावा करत आहेत. परंतु जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद प्रशासनाकडून या संबंधी टोलवाटोलवी केली जात आहे. बालकांना डिजिटल माध्यमातून अक्षर ओळख व्हावी, म्हणून ग्रामपंचायतीमार्फत या दोन अंगणवाड्यांसाठी टी. व्ही. संच व इ-लर्निंग साहित्य खरेदी करण्यात आले आहे. परंतु इमारत नसल्यामुळे डिजिटल साहित्य वापराविना पडून आहे.
अंगणवाडी बांधकामाचा प्रश्न लवकरच सुटला नाहीतर या संबंधी राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाकडे याचिका दाखल करणार असल्याचे जुवार्डी येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पाटील यांनी कळवले आहे.