पिंपळगाव (हरे.) ता. पाचोरा : बोगस बियाण्यांपासून शेतकरी राजाची फसवणूक होऊ नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष पुरवावे, अशी मागणी शेतकऱ्यांतर्फे केली जात आहे.
पावसाळा काही दिवसांवर आल्याने कृषी केंद्रधारकांनी आपल्या दुकानात वेगवेगळ्या कंपनीचे बियाणे विक्रीसाठी उपलब्ध करून ठेवले आहेत. कधी पावसाळा सुरू होईल व शेतकरी आपापल्या शेतात पेरणी करण्यासाठी बियाण्याची खरेदी करेल, याकडे सर्व दुकानदारांचे लक्ष लागून आहे. मृग नक्षत्रात झालेली पिकांची लागवड ही शेतकरी राजासाठी लाभदायी ठरते. उत्पादनात वाढ होते व पिकांवर येणाऱ्या रोगराईचे प्रमाण हे कमी असते. शेती व्यवसायामध्ये उत्पादनात वाढ होण्यासाठी पिकांची योग्य वेळेवर लागवड होणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे चांगले बियाणे उपलब्ध होऊन त्याची लागवड करणे यावर संपूर्ण वर्षाचे नियोजन अवलंबून असते. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले बियाणे उपलब्ध व्हावे. बोगस बियाण्यांपासून शेतकरी राजाची फसवणूक होऊ नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकरी बांधवांकडून केली जात आहे.