भजे गल्लीत पुन्हा थाटले अतिक्रमण
जळगाव : नवीन बस स्थानकाच्या पाठीमागील भजे गल्लीत गेल्या आठवड्यात मनपा प्रशासनाने अतिक्रमण मोहीम राबवून, सर्व रस्ता मोकळा केला होता; मात्र मनपा प्रशासनाची कारवाई मोहीम थंडावल्याने, या ठिकाणी पुन्हा विविध प्रकारच्या व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्यामुळे वाहतुकीला अडथळा ठरत आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने पुन्हा कारवाई मोहीम हाती घेण्याची मागणी होत आहे.
खाऊ गल्लीतील व्यावसायिकांमुळे अस्वच्छता
जळगाव : मनपा इमारतीलगत असलेल्या खाऊ गल्लीत येथील व्यावसायिक रात्री व्यावसाय आटोपल्यानंतर, रस्त्यावरच दुकानाचा कचरा व सांडपाणी टाकत आहेत. यामुळे रस्त्यावरून वापर करणाऱ्या नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे, तसेच या ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त खाद्य पदार्थांच्या हातगाड्या उभ्या राहत असल्यामुळे दिवसा या रस्त्यावरून चालणेही अवघड झाले आहे, तरी मनपा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
नवीपेठेतील गल्ली-बोळीत साचले कचऱ्यांचे ढीग
जळगाव : शहरातील नवीपेठेत अनियमित साफसफाईअभावी गल्ली- बोळींमध्ये कचऱ्यांचे ढीग साचल्याने येथील व्यावसायिकांवर व खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे, तसेच गटारींही तुंबल्यामुळे मोठ्या प्रमाणावर डासांचा प्रादुर्भाव झाला आहे, तरी मनपा प्रशासनाने नवीपेठेत स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी करण्यात येत आहे.
रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी
जळगाव : सुरत रेल्वे गेटकडून शिवाजी नगरकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, अनेक ठिकाणी खड्डे पडून, दगड-गोटे वर आले आहेत, तसेच धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत असून, दररोज वाहतूक कोंडी उद्भवत आहे, तरी मनपा प्रशासनाने या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी वाहनधारकांमधून होत आहे.