मागील वर्षापासून या रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. काही ठिकाणी रस्त्याला संरक्षण म्हणून अपूर्ण भिंती बांधण्यात आल्या आहेत. पुढील ठिकाणच्या संरक्षण भिंती अजूनही बांधलेल्या नाहीत. याबाबत मागील वर्षी सा.बां.चे अधिकारी प्रमोद सुशीर यांनी या अपूर्ण संरक्षण भिंतीच्या कामाची पाहणीही केली होती. त्यावेळेस गोरगावलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर, पोलीस पाटील विनोद पाटील, कृषी मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील हेही उपस्थित होते.
याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणार असल्याचे सुशीर यांनी सांगितले होते; पण ठेकेदार यांनी अपूर्ण संरक्षण भिंतीच्या ठिकाणी माती, मुरूम, खडी, रेतीचा भराव करून रस्ता बनविला आहे. सध्याच्या पावसामुळे तेथील भराव वाहून गेल्याने नवीन अर्ध्या रस्त्यातच मोठमोठ्या भेगा पडलेल्या आहेत. येथे सध्या मातीचा भराव करण्यात येत आहे; परंतु पुढील पावसाच्या पाण्यामुळे हा भराव वाहून अपघात होण्याचा धोका आहेच. म्हणून ह्या अपूर्ण संरक्षण भिंतीचे काम संबंधित विभाग व ठेकेदार यांनी त्वरित पूर्ण करावे, अशीही मागणी गोरगावले बु. पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केली आहे.