जळगाव : जळगाव शहरासह जिल्ह्यात कोरोनाची स्थिती चांगलीच नियंत्रणात आल्याने सर्व दुकाने पूर्ण वेळ सुरू करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी कॅट या व्यापारी संघटनेच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
याविषयी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दीड वर्षापासून व्यवसाय वारंवार बंद राहत असल्याने दैनंदिन खर्च, पगार, दुकान व गुदाम भाडे, वीजबिल, कर्जाचे हप्ते सुरूच आहे. त्यात खेळते भांडवलही संपले आहे. आता संक्रमण परिस्थिती आटोक्यात येत २० ते २५ दिवसांत संपूर्ण जिल्ह्यात कोरोना रुग्ण कमी आढळून येत आहे. त्यामुळे आता व्यापार व अर्थचक्राला गती येणे आवश्यक आहे. याचा विचार सर्व व्यवसाय, हॉटेल, लॉज पूर्ण वेळ सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर कॅट संघटनेचे राज्य वरिष्ठ उपाध्यक्ष पुरुषोत्तम टावरी, उपाध्यक्ष दिलीप गांधी, सचिव प्रवीण पगारिया, जिल्हाध्यक्ष संजय शाह, संचालक रामजी सूर्यवंशी, सुभाष कासट, शंकर ललवाणी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.