जळगाव: जिल्ह्यातील सर्व कंझ्यूमर प्रॉडक्ट वितरकांनी एकजूट होऊन आव्हानांचा सामना केला पाहिजे आणि भविष्यासाठी सज्ज झाले पाहिजे, असे प्रतिपादन ऑल इंडिया कन्झ्युमर प्रॉडक्ट डिस्ट्रिब्युटर फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी केले. ग्राहकांना योग्य दरात वस्तू मिळण्यासाठी ‘एक राष्ट्र, एक किंमत’ हे धोरण लागू करण्याची मागणी त्यांनी केली. ते जळगाव कंझ्यूमर प्रॉडक्ट्स वितरक असोसिएशन आणि तालुका कंझ्यूमर प्रॉडक्ट्स वितरक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच झालेल्या वितरक स्नेहमेळाव्यामध्ये बोलत होते.
धैर्यशील पाटील यांनी मॉडर्न ट्रेड म्हणजे सुपरशॉप्स व मॉल्स आणि जनरल ट्रेड म्हणजे शहरातील तसेच गावांमधील व्यवसाय यामधील वस्तूंच्या किंमतीमधील फरक लक्षात आणून दिला. भावातील तफावत व मॉडर्न ट्रेडसाठीच उपलब्ध असणारी विशेष पॅकिंग व त्यामुळे ग्राहकांची होणारी लूट व वितरक बांधवाना होणारा मनस्ताप याबाबत माहिती सांगितली. ‘एक राष्ट्र, एक किंमत’ हे समीकरण देशभरात लागू व्हायला पाहिजे, म्हणजे ग्राहकांना योग्य दरात उत्पादने उपलब्ध होऊन कोणतीही फसवणूक होणार नाही, अशी मागणी केली.
व्यासपीठावर राज्याच्या फेडरेशनचे सचिव प्रफुल जैन, राज्य कोषाध्यक्ष विजय नारायणपुरे, जळगाव जिल्हा असोसिएशनचे संदीप बेहेडे, उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख, जिल्हा सचिव माधव खेतान, सहसचिव अनुप अग्रवाल, जळगाव तालुका असो. अध्यक्ष अरुण जाजू, सहसचिव सचिन मुंदडा, कोषध्यक्ष महेश गाडोदिया आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक माधव खेतान यांनी केले. आभार असोसिएशनचे अध्यक्ष संदीप बेहेडे यांनी मानले. सूत्रसंचालन अपूर्वा वाणी यांनी केले.