जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकाचे काम निधीअभावी बंद पडले असून यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी स्मारक समितीचे उपाध्यक्ष प्रदीप भोळे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी शनिवारी निवेदन दिले.
आघाडी सरकारच्या काळात स्मारकासाठी अजित पवार यांनी ४९२. ३० लक्ष रुपये निधी दिला होता. त्यानंतर तत्कालीन पालकमंत्र्यांच्या सुचनेवरून त्यात ४९९. ७८ लक्ष इतक्या रकमेस सुधारीत मान्यता मिळवून तत्कालीन पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या कार्यकाळात बहिणाबाई स्मारक समितीच्या परिश्रमाने स्मारकाचे काम सुरू झाले. मार्च २०१९ अखेरीस ४१६ .८० लक्ष रुपये निधी स्मारकाच्या कामासाठी खर्च झाला आहे. परंतू २०१९-२० व २०-२१ या वर्षी निधी प्राप्त न झाल्यामुळे हे काम बंद पडलेले आहे. काम अपूर्णावस्थेत असून ठेकेदारास ७० लाख रूपये देणे बाकी असल्याचे निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, स्मारक परिसरात ३०० लक्ष वाढीव व मंजूर निधी उपलब्ध करून दिल्यास स्मारक हे विलोभनीय होईल त्यामुळे हा निधी मंजूर करून कामाला सुरूवात करावी, अशी मागणी स्मारक समितीचे उपाध्यक्ष प्रदीप भोळे यांनी केली आहे.