पाणपोई सुरू करण्याची मागणी
जळगाव : कोरोनामुळे गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून सुभाष चौकातील मनपाची पाणपोई बंद आहे, यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी गैरसोय होत आहे, तरी सध्या उन्हाळा सुरू झाल्याने नागरिकांची गैरसोय लक्षात घेता मनपाने ही पाणपोई तातडीने सुरू करण्याची मागणी होत आहे.
दाणा बाजारात लहान वाहनांना बंदी घालण्याची मागणी
जळगाव : शहरातील बाजारपेठेचा महत्त्वाचा भाग असलेल्या दाणा बाजारात दिवसभर अवजड वाहनांची वर्दळ सुरू असते, त्यात दुचाकी व चारचाकी अशा लहान वाहनांचा या बाजारातून वापर सुरू असल्यामुळे दररोज वाहतूक कोंडी होत आहे. मनपा प्रशासनाने दाणा बाजारातून लहान वाहनांना बंदी घालण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
कुशीनगर एक्स्प्रेसची वेळ बदलण्याची मागणी
जळगाव : जळगावहून मुंबईकडे जाणाऱ्या कुशीनगर एक्स्प्रेसची वेळ बदलल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या गाडीची वेळ पुन्हा पूर्वीप्रमाणे रात्री आठ वाजता करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे, तसेच या गाडीला जादा जनरल डबे जोडण्याचीही मागणी होत आहे.
कोरोनामुळे निम्मेच कर्मचारी कामावर
जळगाव : सध्या कोरोनामुळे बसफेऱ्या कमी असल्याने महामंडळ प्रशासनातर्फे चालक व वाहक कर्मचाऱ्यांची ५० टक्के उपस्थिती केली आहे. चालक व वाहक हे अत्यावश्यक सेवेत असल्यामुळे त्यांना कर्तव्यावर नेहमी हजर राहणे क्रमप्राप्त आहे. मात्र, कोरोनामुळे फेऱ्या कमी होत असल्याने आगार प्रशासनातर्फे या चालक-वाहकांचीही ५० टक्के उपस्थिती करण्यात आली आहे.