या विषयी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ११ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. मात्र आता मे महिन्यात शेतीची कामे करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू होते. त्यांना वेळेवर आवश्यक साहित्य उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यात दुकाने सकाळी सात ते ११ या वेळेतच सुरू राहिल्यास व खरेदीची लगबग वाढून गर्दी होऊन कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे ही दुकाने सकाळी सात ते संध्याकाळी सात या वेळेत सुरू ठेवण्याविषयी कृषी आयुुक्तांनी २७ एप्रिल रोजी परिपत्रक काढले असून ते सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे. यात अनेक जिल्ह्यात याची अंमलबजावणी सुरू झाली असून जळगाव जिल्ह्यातही ही अंमलबजावणी व्हावी, यासाठी आदेश काढावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
निवेदनावर कॅट संघटनेचे राज्य वरिष्ठ उपाध्यक्ष पुरुषोत्तम टावरी, उपाध्यक्ष दिलीप गांधी, सचिव प्रवीण पगारिया, जिल्हाध्यक्ष संजय शहा आदींच्या सह्या आहेत.