पारोळा : नारपार-दमणगंगा खोऱ्यातील नद्यांमधील वाहून जाणारे दुर्लक्षित पाणी गिरणा नदी पाण्याच्या उगम स्थळी वळवून उत्तर महाराष्ट्राचा पाणी प्रश्न मिटविण्यात यावा, अशी मागणी पारोळा शेतकरी संघटनेतर्फे २२ रोजी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या योजनेतून कायमस्वरूपी दुष्काळी परिस्थिती नाहीशी होऊन पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न कायमचा सुटू शकतो. याबाबत माधवराव चितळे समितीने १९९८ मध्ये शासनाला अहवाल दिला होता. याद्वारे १५६ टीएमसी पाणी उपलब्ध होऊ शकते, असे अहवालात स्पष्ट केले होते. आता या योजनेबाबत सकारात्मक पाऊल उचलले जावे, अशी शेतक-यांकडून अपेक्षा असल्याचे निवेदनात म्हटले आहे.मुख्यमंत्री फडणवीस हे महाजनादेश यात्रेनिमित्त येथे आले असताना त्यांना निवेदन देणयात आले. यावेळी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, उपाध्यक्ष दत्तू पाटील, युवा उपाध्यक्ष जितेंद्र पाटील,भटू पाटील, नाना मिस्त्री, सुमित पाटील, नरेश चौधरी, खुशाल राजपूत, भूषण निकम, वेदांत पाटील इत्यादी संघर्ष शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.