लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना प्रार्दुभावामुळे २३ फेब्रुवारीपासून दिव्यांग कार्ड देणे बंद करण्यात आले आहे. मात्र तरीदेखील लॉगिनचा दुरुपयोग करून मोठ्या प्रमाणात दिव्यांग युडीआयडी कार्ड तयार केले जात आहेत. याबाबत प्रहार अपंग क्रांती संस्थेने या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडून प्रहार अपंग क्रांती संघटनेला मेल प्राप्त झाला आहे. तसेच याबाबत प्रहार अपंग क्रांती संघटना, अमळनेर, धुळे व मुक्ताईनगर येथील कार्यकर्त्यांकडे पुरावे प्राप्त झालेले आहेत. त्याची चौकशी करण्यात यावी. तसेच याबाबत पुढील १५ दिवसात कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे. यावेळी धुळे जिल्हाध्यक्ष शशिकांत सूर्यवंशीसह खजिनदार ॲड. कविता पवार, शहराध्यक्ष योगेश पवार, प्रा. जयश्री साळुंके उपस्थित होत्या.