तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य मार्ग क्र. ४८ वलवाडी बुद्रुक ते भडगाव रस्त्याचे डांबरीकरणाचे काम नुकतेच करण्यात आले आहे. या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. महिनाभरात रस्ता ठिकठिकाणी खचून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याचे काम करताना कच्चे डांबरीकरण करण्यात आले आहे. त्या ठिकाणी पूर्णपणे बारीक खडी निघून मोठमोठे खड्डे पडत आहेत. या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, असेही निवेदनात म्हटले आहे.
या रस्त्याच्या दुर्दशेमुळे मोटारसायकल घसरून गंभीर दुखापत किंवा जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्यावर अपघात झाल्यास संबंधित ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहील. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता? तेच वाहनधारकांना समजत नाही. रस्त्यावर छोट्या-मोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. पायी चालणाऱ्या शेतकरी, नागरिकांना या रस्त्यावरून जाणे मोठ्या त्रासाचे ठरत आहे. वाहने पंक्चर होणे, छोटे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहनधारकांंत संतापाचे वातावरण पसरले आहे.
येत्या ८ ते १० दिवसात रस्त्याचे काम न केल्यास ग्रामस्थ वलवाडी बुद्रुक ते भडगाव रस्त्यावर चक्काजाम आंदोलन करतील, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर सरपंच पूजा पाटील, उपसरपंच शांताराम पाटील, धनराज बागूल, सुनील पाटील, योगेश पाटील, उषा पाटील, आशा मोरे, साहेबराव मोरे आदी ग्रामपंचायत सदस्यांच्या सह्या आहेत. निवेदन देताना विकास पाटील, संजय पाटील यांच्यासह विकासोचे माजी संचालक हिम्मत पाटील उपस्थित होते.