शिरसोली प्र.बो. व प्र.नं. या दोन्ही गावांच्या माध्यमातून जळगाव- मनमाड हा महामार्ग गेला असून, रस्त्याला लागूनच बारी समाज शाळा, पद्मालया इंग्रजी शाळा, मराठी मुला-मुलींची शाळा असून, अनेक व्यापारी संकुले असल्याने या रस्त्यावर प्रवासी वर्गासह विद्यार्थी, ग्राहक व ग्रामस्थांसह मोठी वर्दळ असते. या महामार्गाचे आताच रुंदीकरण झाल्याने या रस्त्यावरील रहदारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, तसेच रस्त्यामध्ये कुठेही गतिरोधक व डिव्हायडर नसल्याने वाहन चालक आपली वाहने सुसाट वेगाने पळवत असतात. यामुळे येथील महामार्गावर अपघाताची मालिका ही नित्याचीच ठरली आहे. यामुळे येथे अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून, काहींना अपंगत्व आले आहे, तसेच लहान- मोठे अपघात होण्यासह वादही वाढले आहेत. येथील ग्रामस्थांनी गतिरोधकाची मागणी बऱ्याच वेळा करूनदेखील होत नसल्याने ग्रामस्थांसह विद्यार्थी हताश झाले आहेत. तरी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने जातीने लक्ष घालून दूर्वांकुर लान्स ते आकाशवाणी केंद्राच्या कोपऱ्यापर्यंत गतिरोधक, डिव्हायडर व स्ट्रीट लाइट बसविण्याची मागणी होत आहे.
---------------------------------------
रात्रीच्या वेळेस महामार्गावर अंधाराचे साम्राज्य पसरल्याने पायी चालणे व दोनचाकी वाहन चालविणे कठीण झाल्याने या रस्त्याच्या मधोमध स्ट्रीट लाइट बसविण्याची मागणी होत आहे.