जळगाव : अत्यावश्यक सेवेतील दुकानांच्या वेळा सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत सुरू ठेवण्याची परवानगी मिळण्यासह इतरही दुकाने सुरू करण्यात यावी, अशी मागणी कॅट संघटनेने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली आहे.
या संदर्भात पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अत्यावश्यक सेेवेतील दुकानांना सकाळी सात ते ११ ही वेळ असली तरी सकाळी सात वाजेपर्यंत शहरातील व बाहेर गावचे ग्राहक येऊ शकत नाही. खरा व्यवसाय सकाळी नऊ वाजल्यानंतर सुरू होतो. त्यामुळे सकाळी ९ ते ११ या वेळेत अधिक गर्दी होते. तसेच ११ वाजल्यानंतर थोडा जरी माल राहिला तरी कारवाई केली जाते. त्यामुळे या दुकानांना सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत सुरू ठेवण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी केली. यासोबतच आता कोरोनाचा संसर्ग बराच कमी झाला असून, इतरही दुकाने सुरू करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी करण्यात आली.
निवेदन देताना कॅट संघटनेचे राज्य वरिष्ठ उपाध्यक्ष पुरुषोत्तम टावरी, उपाध्यक्ष दिलीप गांधी, सचिव प्रवीण पगारिया, जिल्हाध्यक्ष संजय शहा, संचालक सुभाष कासट, शंकर ललवाणी, रामजी सूर्यवंशी, आदी उपस्थित होते.