लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : भुसावळ येथील डॉ. नीलेश तुकाराम पाटील यांच्या नावे फेसबुकवर बनावट खाते तयार करून त्याच्या मित्रांसह नातेवाइकांना फोन-पे किंवा पेटीएमच्या माध्यमातून पैश्यांची मागणी होत असल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. याप्रकरणी गुरुवारी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ शहरातील गणेश कॉलनी येथील रहिवासी डॉ. नीलेश तुकाराम पाटील यांच्या नावे १८ व १९ मे रोजी अज्ञात व्यक्तीने फेसबुकवर बनावट खाते तयार केले. त्यात पाटील यांचा फोटो घेतला. या बनावट खात्यावरून पाटील यांच्या मित्रांसह नातेवाइकांकडून पैशांची मागणी केल्याचे समोर आले आहे. ही रक्कम फोन-पे किवा पेटीएमच्या माध्यमातून जमा करण्याचे ही व्यक्ती सांगत आहे. बनावट खाते तयार करून इतरांची फसवणूक होत असल्याची माहिती पाटील यांना समजली. त्यांनी गुरुवारी सकाळी जळगाव येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक बळीराम हिरे करीत आहे.