उद्यानांमध्ये स्वच्छता करण्याची मागणी
जळगाव : जिल्हा परिषदेजवळील मनपाच्या डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यानात अनियमित स्वच्छता होत असल्यामुळे, या ठिकाणी फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तसेच अनियमित स्वच्छतेमुळे मोठ्या प्रमाणावर डासांचा प्रादुर्भाव झाला आहे. तरी मनपा प्रशासनाने या उद्यानात नियमित स्वच्छता करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
पासेस काढण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी
जळगाव : शाळा सुरू झाल्याने शहरात येणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. परिणामी पासेस काढण्यासाठी जळगाव आगारात विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. महामंडळातर्फे पासेस वितरणासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रभात चौकात पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी
जळगाव : महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे प्रभात चौकात दिवसभरात अनेकवेळा वाहतुक विस्कळीत होत आहे. परिणामी वाहतूक कोंडी होऊन, पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे अवघड झाले आहे. तरी मनपाने या चौकात वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी वाहनधारकांमधून होत आहे.
अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडी
जळगाव : नेहरू चौकाकडून टॉवर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरच दुचाकी व चारचाकी वाहने उभी करण्यात येत असल्यामुळे, दररोज वाहतूक कोंडी उद्भवत आहे. यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरी मनपा प्रशासनाने या वाहनधारकांवर कारवाईची मागणी होत आहे.