जळगाव : जळगाव ते औरंगाबाददरम्यान सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामात कुुसुंबा येथे वाहतुकीची समस्या वाढत असल्याने समांतर रस्ता करून मिळण्याची मागणी तालुका कॉंग्रेसच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव ते औरंगाबाददरम्यान महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असून यामध्ये मुख्य मार्ग बंद आहे. त्यामुळे कुसुंबा येथील दत्तमंदिर ते पाण्याची टाकी या दरम्यानच्या रस्त्याचा वापर वाढला आहे. यामध्ये अवजड वाहने, पाण्याचे टँकर, मालवाहतूक वाहने, प्रवासी रिक्षा असे सर्व प्रकारचे वाहनांची सतत ये-जा सुरू असते. या रस्त्याचा वापर वाढल्याने समांतर रस्ता म्हणून तो तयार करून मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याविषयी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर प्रमोद घुगे, भिकन सोनवणे, भाऊसाहेब सोनवणे, अरुण पाटील, धनराज जाधव, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.