जळगाव : मुंबई बांद्रा क्राईम बॅ्रंचचा पोलीस निरीक्षक असल्याचे सांगून खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी व शहर बंदी असलेल्या आबा उर्फ मुकेश बाविस्कर याला दोन लाख रुपयाची खंडणी मागून धमकावण्यात आले. विशेष म्हणचे हा प्रकार चोपडा शहर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांसमोर घडला. दरम्यान, झालेल्या प्रकाराची बाविस्कर याने पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे.
खुनाच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या आबा बाविस्कर याला जामिनानंतर जळगाव शहर बंदी करुन चोपड्याचे वास्तव्याचे आदेश दिले आहेत. २८ ऑगस्ट रोजी बाविस्कर याला एका कॉन्स्टेबलच्या माध्यमातून चोपडा शहरचे पोलीस निरीक्षक विकास वाघ यांनी पोलीस ठाण्यात बोलावले. तेव्हा राजेंद्र महाजन नावाच्या व्यक्तीने एका अनोळखी व्यक्तीला फोन केला असता समोरुन मी बांद्रा मुंबई क्राईम ब्रॅँचचा निरीक्षक पगारे बोलतो आहे. आम्ही येथे नईम शेख नावाचा आरोपी पकडला आहे. त्याने हे पिस्तुल जळगावच्या आबा बाविस्करकडून घेतल्याचे सांगितले आहे. त्यानुसार आमचे एक पथक तुला घेण्यास येईल असे धमकावले.
लॉकअप गार्डच्या मोबाईलवर मागितली खंडणी
वाघ यांच्याशी संभाषणानंतर बाविस्कर याला लॉकअप गार्डच्या ताब्यात देण्यात आले. नंतर त्यांच्याही मोबाईलवर पुन्हा कॉल आला.मुंबई क्राईम ब्रॅँचचा हिसका दाखविल्यावर तो पोपटासारखा बोलशील असे धमकावले. त्यानंतर थोड्यावेळाने पुन्हा फोन करुन यातून सुटका हवी असेल तर दोन लाख रुपयाची व्यवस्था करण्याचे सांगितले. विनवण्या केल्या असता एक लाख व नंतर ५0 हजारावर आले. फारच विनवण्या केल्यानंतर ३0 हजार मागितले. पैसे देण्यासाठी एका व्यक्तीचा फोन नंबर मागण्यात आला. रात्री १२ वाजेपर्यंत हे सत्र सुरू होते.