वाहतूक पोलीस नियुक्त करण्याची मागणी
जळगाव : आकाशवाणी चौकात सायंकाळी वाहतूक पोलीस नसल्यामुळे वाहने सुसाट जात आहेत. तसेच सिग्नल यंत्रणाही बंद असल्यामुळे महामार्गावरील वाहनधारकही न थांबता वाहने वेगाने चालवित आहेत. यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. वाहतूक विभागाने या चौकात वाहतूक पोलीस नियुक्त करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
अनियमित साफसफाईअभावी आरोग्य धोक्यात
जळगाव : नवीपेठेत अनियमित वेळेवर साफसफाई होत नसल्यामुळे गल्लीबोळात कचऱ्यांचे ढीग पसरले आहेत. यामुळे साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मनपा प्रशासनाने या भागात साफसफाई मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
हुतात्मा एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी
जळगाव : कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून हुतात्मा एक्सप्रेस बंद असल्यामुळे पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना रात्रीच्यावेळी पुण्याला जाण्यासाठी सोयीची असल्यामुळे, या गाडीला सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळत आहे. मात्र, आता कोरोनामुळे ही गाडी बंद असल्यामुळे प्रवाशांना जादा पैसे मोजून पुण्याला जावे लागत आहे. रेल्वे प्रशासनाने हुतात्मा एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
स्टेशनसमोरील अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी
जळगाव : रेल्वेस्टेशनसमोर सायंकाळी विविध खाद्यपदार्थ विक्रीच्या हातगाड्या लागत असल्यामुळे, रस्त्यावर वाहतूक कोंडी उद्भवत आहे. यामुळे प्रवाशांना पायी चालणेही अवघड झाले आहे. तरी मनपा प्रशासनाने येथील अतिक्रमण हटवावे, अशी मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.