डिगंबर महाले
अमळनेर : गतवर्षी जूनमध्ये पहिले अनलॉक झाले. त्यानंतरचे दोन महिने शाळा ऑनलाइनच होती. परिणामी मोबाइल, टॅब, लॅपटॉप खरेदीसाठी मोठी गर्दी होती. यंदा त्या तुलनेत गर्दी कमी आहे. गेल्या वर्षी एका दिवसात एका दुकानात १०० ग्राहक दुकानांमध्ये येऊन खरेदी करत असतील तर यंदा ते प्रमाण ७० आहे. मागील वर्षी जून ते सप्टेंबर आणि दसरा-दिवाळी काळात मोबाइल, लॅपटॉप खरेदीसाठी ग्राहकांची धूम होती. लॉकडाऊनच्या काळात विदेशी इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांची उत्पादने ग्राहकांपर्यंत ऑनलाइन पोहोचत नव्हती. त्यामुळे ग्राहक दुकानांकडे वळले होते. यंदा ऑनलाइनची सुविधा असली तरी गेल्यावेळचा अनुभव लक्षात घेऊन ७० टक्के ग्राहक दुकानांत येत आहेत. गतवर्षी अनलॉक होताच ग्राहकांची तुंबळ गर्दी झाली होती. नवीन मोबाइल, टॅबची सर्वाधिक विक्री झाली. राखीव ठेवलेला स्टॉकही कमी पडला होता. कारण ऑनलाइन खरेदीची सुविधा नव्हती.
यंदा कंपन्यांची उत्पादने थेट घरी मागवणे शक्य आहे. तरीही ७० टक्के लोक दुकानांमध्ये येत आहेत. मोबाइल दुरुस्तीसाठी आणणाऱ्यांचे प्रमाणही चांगले आहे. मध्यमवर्गीय पालक १० ते १५ हजारांच्या किमतीतील मोबाइल घेण्यावर भर देत आहेत. सधन पालक २३ ते ५० हजारांपर्यंतच्या मोबाइलला पसंती देत आहे. ५ जी येत असल्याने ग्राहक ४ जीबी रॅम, १२८ जीबी मेमरी, ॲण्ड्रॉइड, स्लीम मोबाइल घेण्यावर भर देत आहेत. काही जण १० हजार रुपयांपर्यंतचा टॅब खरेदी करत आहेत.
ग्राफिक्स कार्ड इनबिल्ट
रिफर्निंश म्हणजेच काही वर्षे वापरलेले आणि कंपनीमार्फत पुन्हा रिपॅकिंग केलेल्या लॅपटॉपलाही (५० ते ७० टक्के कमी किंमत) चांगली मागणी आहे. यांची किंमत नव्या लॅपटॉपपेक्षा साधारणत: २५ ते ७५ टक्क्यांनी कमी असते, हे त्यांच्या व्यापक पसंतीचे खरे गमक आहे.
कोर आय ३, आय ५ विथ ग्राफिक्स कार्डची मागणी होत आहे. येणाऱ्या काळात एएमडी कंपनी रायझन ३,५,७ अशा प्रकारात प्रोसेसर आणत असून यात ग्राफिक्स कार्ड इनबिल्ट असणार आहे.
चोखंदळता वाढली
मोबाइलबाबत आता अनेक ग्राहकांना चांगल्या प्रकारे तांत्रिक माहिती झाली आहे. त्यामुळे त्यांच्यातील चोखंदळता वाढली आहे. आगामी काळात मोबाइल क्षेत्रात मोठी तांत्रिक क्रांती अपेक्षित आहे.
-कमलेश निरंकारी, मोबाइल विक्रेता, अमळनेर
विद्यार्थ्यांकडे आता प्रगत तंत्रज्ञानाचे मोबाइल आहेत. ऑनलाइन शिक्षण चांगल्या रीतीने आत्मसात व्हावे म्हणून पालकही सढळ हाताने मोबाइल खरेदी करत आहेत.
-ए.एस. करस्कार, उपमुख्याध्यापक, जी.एस. हायस्कूल, अमळनेर