जळगाव : शहरात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढतच असून, उपाययोजना म्हणून कीटकनाशक फवारणी करण्यात यावी, अशी मागणी कॅट संघटनेच्या वतीने महापालिकेकडे करण्यात आली आहे. शहरात संसर्ग वाढून दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत आहे याचा विचार करून फवारणी करण्यात यावी, अशी मागणी संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष पुरुषोत्तम टावरी, उपाध्यक्ष दिलीप गांधी, सचिव प्रवीण पगारिया, जिल्हाध्यक्ष संजय शहा, संचालक रामजी सूर्यवंशी, सुभाष कासट, शंकर ललवाणी यांनी केली आहे.
बीएचआरचे कार्यालय सुरू करावे
जळगाव : नवीन अवसायक चैतन्य नासरे यांची नियुक्ती होऊन महिना उलटला. मात्र, अद्याप बीएचआरचे सील केलेले कार्यालय अद्याप उघडलेले नाही, ना अवसायक यांना जप्त केलेली कागदपत्र दिली. त्यामुळे कामकाजाला सुरूवात झालेली नाही. त्यामळे लवकरात लवकर कार्यालय उघडावे व कागदपत्र त्यांना द्यावे. जेणे करून ठेवीदारांना ठेवीच्या रक्कमा पुन्हा मिळण्याची आशा निर्माण होईल, अशी मागणी महाराष्ट्र राज्य ठेवीदार संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आली आहे. जर कार्यालय उघडले नाही तर १ मे रोजी जेलभरो आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
जळगाव : खान्देश युनियन एज्युकेशन सोसायटी संचलित कै. गिरिजाबाई नथ्थूशेठ चांदसरकर प्राथमिक विद्यामंदिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक श्याम ठाकरे, जयश्री पाटील, स्वप्निल भोकरे, महेश तायडे, भूषण अमृतकर आदींची उपस्थिती होती.