ममुराबाद, ता. जळगाव : कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण गावांत प्रतिबंधक उपाययोजना म्हणून सोडीयम हायड्रोक्लोराईडची तातडीने फवारणी करून प्रभावी जनजागृती करण्याची मागणी ममुराबाद विकास मंचने ग्रामपंचायतीकडे निवेदनाद्वारे केली आहे.महाभयंकर अशा कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात व भारतात हाहाकार माजविला असून, दिवसेंदिवस या आजाराची व्याप्ती वाढतच चालली आहे. केंद्र सरकार व राज्य शासन आवश्यक ती खबरदारी घेऊन उपाययोजना करत आहे. वृत्तपत्रांसह वृत्त वाहिन्या व सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रचार- प्रसार करून जनजागृती करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीनेही नैतीक जबादारी म्हणून आपल्या ममुराबाद गावात प्रत्येक गल्लीत, वाड्यात, चौकात, लहान वस्त्यांमध्ये सोडीयम हायड्रोक्लोराईडची फवारणी करावी. व्यापक स्वच्छता मोहीम राबवावी. बसस्थानक परिसर, मुख्य चौकात, कोरोना व्हायरसच्या रोगा विषयी माहितीचे फलक, होल्डींग लावावे. घराघरात पत्रके वाटून कोरोना व्हायरसची लागण होऊ नये म्हणून घ्यावयाच्या काळजीबद्दल जनजागृती करावी. त्यामुळे कोणी अफवांना बळी पडणार नाही. सर्वजण योग्य ती काळजी घेतील. त्यादृष्टीने ग्रामपंचायत प्रशासनाने युद्ध पातळीवर कार्यवाही करावी, असेही ममुराबाद विकास मंचने निवेदनात म्हटले आहे.
ममुराबादला औषध फवारणीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 8:39 PM