कजगाव, ता. भडगाव : गेल्या दीड वर्षापासून कोरोना संक्रमणामुळे भुसावळ-देवळाली व मुंबई-भुसावळ या पॅसेंजर व हुतात्मा एक्स्प्रेस बंद असल्याने प्रवासी वर्गाची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.
कजगाव व परिसरातील पन्नास खेड्यातील हजारो ग्रामस्थ नेहमी कजगाव येथून जळगाव, नाशिक येथे विविध कामांसाठी प्रवास करीत असतात. मुंबई, नाशिक, जळगाव-भुसावळ, पुणे हे दूरचे प्रवास रेल्वेनेच योग्य असल्याने ग्रामस्थांची पहिली पसंती ही पॅसेंजर गाड्याला असते. ग्रामीण भागातील नागरिकांचा गरीबरथ म्हणजेच पॅसेंजर व हुतात्मा एक्स्प्रेस हे तात्काळ सुरू करण्याबाबतची मागणी जोर धरू लागली आहे.
भुसावळ-देवळाली, भुसावळ-मुंबई पॅसेंजर व हुतात्मा एक्स्प्रेस हे सारे कोरोनामुळे बंद करण्यात आले होते. यामुळे ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली. मात्र, आता सर्व काही सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याप्रमाणे गरिबांच्या गरीबरथ म्हणजेच पॅसेंजर सुरू करण्यासाठी आदेश देण्यात यावे, अशी मागणी पन्नास खेड्यांतील ग्रामस्थांकडून होत आहे.
गेल्या दीड वर्षापासून पॅसेंजर गाड्या बंद असल्याने अनेकांना खाजगी वाहनाने प्रवास परवडत नसल्याने अनेकांना आर्थिक फटका बसत आहे. रेल्वे बंद असल्याने अनेकांना प्रवासासाठी मोठ्या प्रमाणावर अडचणी सोसाव्या लागत असल्याने प्रवासीवर्गाने भुसावळ-देवळाली, भुसावळ-मुंबई व हुतात्मा एक्स्प्रेस तात्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे.