लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मानधनवाढीसह विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांनी जिल्हा परिषदेसमोर मंगळवारी निदर्शने करून अधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन दिले. यावेळी जिल्हा परिषदेत पोलिसांचा बंदोबस्तही लावण्यात आला होता.
गटप्रवर्तक संघटना, आयटक व अन्य ७ संघटनांच्या कृती समितीतर्फे राजभवनावर हे आंदेालन सुरू आहे. यात जिल्ह्यातील २०० पैकी १५० आशा स्वयंसेविका व काही गटप्रवर्तक यांनी सहभाग नोंदविल्याचे आयटकचे राज्य उपाध्यक्ष कॉ.अमृतराव महाजन यांनी सांगितले. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयावरही निदर्शने करून निवेदन देण्यात आल्याचे महाजन यांनी सांगितले. यावेळी सुलोचना साबळे, मीनाक्षी सोनवणे, पल्लवी पाटील, ज्योती सोनवणे, आरती कापुरे, संगीता सातपुते, प्रतिभा पाटील, वैशाली धनगर, आशा पाटील, मनिषा वारुळकर, संजना गोडघाटे, संजना विसावे, गटप्रवर्तक सुनीता ठाकरे, वत्सला मनोरे, मनिषा बारेला, जनाबाई सुंबे, उज्ज्वला खाचणे आदी उपस्थित होते.
या आहेत मागण्या
आशा स्वयंसेविकांना १८ हजार तर गटप्रवर्तक यांना २१ हजारांचे वेतन द्यावे, ५० लाखांचा विमा कवच मिळावे, मे, २०२० पासून रखडलेला प्रोत्साहन भत्ता २ हजार रुपये मिळावे, आरोग्य विभागातील रिक्त जागांमध्ये ५० टक्के आरक्षण मिळावे, दर्जेदार मोबाइल, मास्क, सॅनिटायझर यांचा पुरवठा व्हावा, अशा विविध मागण्यांचे निवेदन आरोग्य विभागात प्रशासकीय अधिकारी प्रतिभा सुर्वे यांना देण्यात आले.