लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात कोरोनाचे रुग्ण कमी होत असताना दुसरीकडे मात्र डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मनपा प्रशासनाकडून खबरदारी म्हणून घरोघरी जावून तपासणीला सुरुवात केली आहे. यामध्ये शहरातील १६ हजार ६२५ घरांमध्ये डेंग्यूच्या डासांच्या अळ्या आढळून आल्याची माहिती मनपा आरोग्य अधिकारी डॉ.विकास पाटील यांनी दिली आहे. याबाबत संबधित घर मालकांना नोटीसा बजविल्या असून, तत्काळ घरातील अळगळीतील भांडे व साचलेले पाणी साफ करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.
गेल्या काही दिवसात शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच अनेक जणांना डेंग्यू सदृश आजाराची लक्षणे देखील आढळून येत आहेत. त्या दृष्टीने मनपा आरोग्य, वैद्यकीय व मलेरिया विभागाकडून शहरातील विविध भागात जावून सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. प्रत्येक घरोघरी जावून ॲबेटींग करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच विविध भागात मनपाकडून फवारणीचे काम देखील हाती घेण्यात आल्याची माहिती डॉ.विकास पाटील यांनी दिली.
आतापर्यंत झालेल्या घरांची पाहणी - ५३ हजार २०७
इतक्या घरांमध्ये आढळल्या डेंग्यूच्या डासांच्या अळ्या - १६ हजार ६२५
तपासलेले कंटेनर - १ लाख ९१ हजार ५२०
दूषित कंटेनर - १६ हजार ९१३
ॲबेटींग करण्यात आलेले भांडे - २१ हजार २८०
काळजी न घेतल्यास मनपाकडून करण्यात येईल दंड
मनपाकडून सर्वेक्षणासह डेंग्युच्या लक्षणांसह नागरिकांनी घर व परिसरात घ्यावयाच्या काळजीबाबत जनजागृती केली जात आहे. तसेच घरोघरी जावून हस्तपत्रके वाटप घेतली जात आहेत. मात्र, तरीही अनेक नागरिक याबाबत गांभिर्याने पालन करत नसल्याने मनपाकडून आता पुढील सर्वेक्षणादरम्यान ज्या घरांमध्ये डेंग्यूच्या डासांच्या अळ्या आढळून येतील अशा घराच्या मालकांवर दंड करण्यात येणार असल्याचा इशारा मनपाकडून देण्यात आला आहे.