भुसावळ ः तालुक्यातील कु-हे ( पानाचे ) येथे गेल्या काही दिवसांपासून साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. गावात चार ते पाच जणांना डेंग्यू सदृष्य आजाराची लागण झाली आहे. तर चौथीत शिकत असलेल्या बालिकेचा तापामुळे द मृत्यू झाल्याची घटना आज २९ रोजी घडली. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान , डेंगूू चा रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती डॉ. पंकज राणे यांनी 'लोकमत ' शी बोलताना दिली आहे.गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गावात रोगराई फैलावली आहे. बरेच ग्रामस्थ तापाने फणफणले आहेत. येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता चौथीत शिकत असलेली पायल योगेश बोबडे (बारी) हिला गेल्या तीन-चार दिवसापासून ताप आला होता. तिला भुसावळ येथे दवाखान्यात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. औषधोपचारादरम्यान पायलला उलटी झाली. त्यावेळी डॉ. रेखा पाटील यांनी पायलला जळगाव येथे हलविण्याचा सल्ला दिला मात्रा पायलचा मृत्यू झाला . अचानक आलेल्या तापाने नेमका आजार कळण्याच्या आत अभ्यासात हुशार असलेल्या पायल हिचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
गावामध्ये डेंग्यू तापाचे 17 सप्टेंबर रोजी चार ते पाच रुग्ण आढळले. मात्र यातील एक रुग्ण ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा तर एक रुग्ण प्राथमिक आरोग्य् केंद्रातील कर्मचाऱ्यांचा नातेवाईक होता . त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांच्या आग्रहाखातर गावात डेंगू झाला असल्याचे दडपण्यात आले . मात्र त्यावेळी तरीही प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी गावात सर्वे केला . तर ग्रामपंचायतीतर्फे धूर फवारणी करण्याच्या् सूचना दिल्या . त्यामुळेे धूर फवारणी करण्यात आली. मात्र तरीही साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळविण्यात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांना अपयश आल्याचे दिसून येत आहे.
डेंगूचा रुग्ण असल्याचे डॉक्टरांनी केले मान्य
दरम्यान, भुसावळ येथे एका खाजगी रुग्णालयात अद्यापही डेंग्यूचा रुग्ण उपचार घेत आहे. त्यासंदर्भात डॉ. पंकज राणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे.