जळगाव : जिल्ह्यात खरीप हंगामात कापूस लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक भागांत अजून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने पिकाला पाण्याचा ताण पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी ज्या ठिकाणी पाण्याची सोय आहे तेथे पिकाला संरक्षित पाणी द्यावे. पाण्याची कमी उपलब्धता असेल तर सरी आड सरी पाणी द्यावे. ठिबक सिंचनाची व्यवस्था असेल तर जमिनीच्या मगदुरानुसार दीड ते दोन तास ठिबक सिंचन संच चालवून पाणी द्यावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दिपत्रकाद्वारे केले आहे.
पावसामुळे गारवा
जळगाव : शहरात गुरुवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास झालेल्या पावसामुळे दोन दिवसांपासून जाणवत असलेल्या उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. गुरुवारी सकाळपासून शहरात कडक ऊन होते. मात्र, दुपारी ४ वाजता आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली. सायंकाळी ५ वाजता १० ते १५ मिनिटे पावसाने हजेरी लावली. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. दरम्यान, २९ पासून जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.