जळगाव : घरफोडीचा प्रयत्न फसल्यानंतर पाठलाग करून पकडलेल्या किरण अनिल बाविस्कर याला मंगळवारी न्यायालयाने कारागृहात तर अल्पवयीन मुलाला (दोन्ही रा. गेंदालाल मिल) बाल निरीक्षणगृहात रवाना केले. शिवाजीनगर हुडकोत मेहमूदखान चॉंदखान पठाण (वय ५२) यांच्या घरात चौघांनी सोमवारी पहाटे अडीच वाजता चोरीचा प्रयत्न केला होता. त्यांना जाग आल्याने पठाण व त्यांच्या मुलाने पाठलाग करुन दोघांना पकडले होते. तपासी अंमलदार विजय निकुंभ यांनी दोघांना मंगळवारी न्यायालयात हजर केले.
बी. जे. मार्केट परिसरातून दुचाकी लांबविली
जळगाव : बी.जे. मार्केट परिसरातील वाणी मंगल कार्यालयाजवळून संकेत संजय मुंदडा (वय २८, रा. लेक व्ह्यू रेसिडेन्सी, मेहरुण तलाव) या व्यावसायिकाची २० हजार रुपये किंमतीची दुचाकी (क्र.एम.एच.१९. सी.एस.३९०४ ) चोरट्यांनी लांबविल्याची घटना १७ फेब्रुवारी रोजी घडली. याप्रकरणी मंगळवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास ज्ञानेश्वर सपकाळे करीत आहेत.