दरम्यान, जितेंद्र कंडारे याचे बाहेरील व कार्यालयातील सर्वच हस्तक आता पोलीस यंत्रणेच्या रडारवर आलेले आहेत. ठेवीदार, कर्जदार व मालमत्ता घेणारे यांची चौकशी होणार आहे. या हस्तकांची माहिती व कारनामे यंत्रणेपर्यंत पोहोचली असल्याचीही माहिती प्राप्त झाली आहे. बहुतांश कर्जदारांनी कर्ज फेडल्यानंतरही त्यांच्या नावावर कर्ज थकीत दाखविले जात आहे. सीआयडीच्या आंतरलेखापरीक्षणात देखील हा मुद्दा प्रामुख्याने घेण्यात आलेला आहे. लेखापरीक्षण करताना संस्थेने जाणूनबुजून काही कर्जदार, ठेवीदार यांची माहिती लपविली आहे तर काहींच्या फाईलीच सादर केलेल्या नाहीत. मोठ्या कर्जाच्या फाईल या महावीर जैन याच्या कार्यालयात आढळून आल्याने तपासाला आणखी वेगळीच दिशा मिळालेली आहे.
राज्यात ८१ गुन्हे १२ गुन्ह्यात दोषारोपपत्र दाखल
बीएचआर अपहार व फसवणूक प्रकरणात चेअरमन व संचालक यांच्याविरुद्ध राज्यातील २२ जिल्ह्यात ८१ गुन्हे दाखल आहेत. या सर्व गुन्ह्यांचे खटले जळगाव न्यायालयात चालविले जाणार आहेत. १२ गुन्ह्यांमधील दोषारोपपत्र न्या.आर.एन.हिवसे यांच्या न्यायालयात दाखल झाले. उर्वरित ६९ गुन्ह्यांचे दोषारोपपत्र देखील याच न्यायालयात दाखल होणार आहे. या सर्व गुन्ह्यात जळगावचेच १४ आरोपी असून त्यात संस्थापक चेअरमन प्रमोद रायसोनी यांच्यासह, १२ संचालक व एक व्यवस्थापक अशा १४ जणांचा सहभाग आहे. सर्व आरोपी जळगाव कारागृहात आहेत.
बड्या नेत्याचे धाबे दणाणले
बीएचआरच्या दुसऱ्या टप्प्यात बड्या नेत्याच्या जवळच्या लोकांना अटक झाली आहे. पुढची कारवाई कुटुंबात होण्याची शक्यता असल्याने या नेत्याने राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भेट घेऊन यात काही मार्ग काढता येईल का? यासाठी ही भेट घेतल्याचे बाेलले जात आहे. दरम्यान, या कारवाईमुळे राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्याही फैरी झडल्या होत्या.
दृष्टिक्षेपात बीएचआर
एकूण शाखा : २६४
एकूण गुन्हे : ८१
एकूण आरोपी : १५ (संचालक)
अटकेतील आरोपी : १४ (संचालक)
फरार आरोपी : ०१
एकूण गुन्ह्यात दोषारोप : १२
शिल्लक गुन्ह्यातील दोषारोप : ६९
आरोपींची सद्यस्थिती : कारागृहात
अवसायक काळातील अटक आरोपी : १७