लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : वरणगाव येथील एकनाथराव खडसे ग्रामीण बीगर शेती सहकारी पतसंस्थेत दुप्पट ठेवी योजनेत दीड लाखांपर्यंतची रक्कम अद्यापही परत मिळाली नसून न्याय मिळावा, अशी मागणी तळवेल व वरणगाव येथील दोन ठेवीदारांनी केली आहे. दरम्यान, त्यांनी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी याबाबत पत्रकार परिषद घेेऊन हे प्रकरण मांडले.
तळवेल ता. भुसावळ यादव जगन्नाथ पाटील आणि वरणगाव येथील प्रकाश रघुनाथ चौधरी यांनी या ठेवी ठेवलेल्या होत्या. यात यादव पाटील यांनी दुप्पट ठेवी योजने अंतर्गत या पतसंस्थेत १० ऑक्टोबर २००६ मध्ये ५० हजार, १७ मे २००६ रोजी २७ हजार, तर १७ ऑगस्ट २००६ रोजी १५०० ठेवले होते. यासह त्यांनी
धनवर्धीनी, महात्मा फुले अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी तसेच लोककल्याण ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेतही ठेवी आहेत. मात्र, या सर्व पतसंस्थांमध्ये गेल्यानंतर कुठलीही रक्कम मिळाली नाही. असे त्यांनी सांगितले तर प्रकाश चौधरी यांनी एकनाथ खडसे ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत ६ ऑक्टोबर २००३ मध्ये दहा हजारांच्या ठेवी ठेवल्या मात्र त्या मिळाल्या नसल्याचे त्यांनी सांगितले दरम्यान, आम्ही २०१० साली खडसे यांची भेट घेतली होती. मात्र, या पतसंस्थेची माझा कुठलाही संबध नसल्याचे खडसे यांनी त्यावेळी सांगितले होेते. मात्र, पतसंस्थेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित होते. असे दोघा ठेवीदारांनी सांगितले. दरम्यान, ज्याप्रमाणे बीएचआर ठेवीदारांसाठी एकनाथ खडसे यांनी पाठपुरावा केला त्याच प्रमाणे त्यांच्या विभागातील ठेवीदारांनाही न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी दीपकगुप्ता यांनी यावेळी केली. अशा प्रकरणांमध्ये केवळ गुन्हे दाखल न करता ठेवीदारांना पैसे परत मिळवून देऊन न्याय मिळावा, अशी मागणी गुप्ता यांनी केली.
चेअरमन महावितरणमध्ये कार्यरत
या पतसंस्थेचे एक चेअरमन सुधीर कोल्हे यांचे निधन झाले असून आताचे चेअरमन प्रवीण पाटील हे महावितरणमध्ये कार्यरत आहे. ठेवीची विचारणा केल्यानंतर एक लाखाचे तीस हजार घ्या व पावत्या ताब्यात द्या, अशी मागणी चेअरमन कोल्हे यांनी केल्याचा आरोप यादव पाटील केला. दरम्यान, आम्ही दोघे रिक्षाचालक असून ठेवी मिळत नसल्याने आम्ही अडचणीत असून संबधितांकडून पैसे मिळावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
केवळ नाव बघून विश्वास
अनेक लोक केवळ नाव पाहून पतसंस्थेवर विश्वास ठेवल्याचेही या ठेवीदारांनी सांगितले. आमचा कष्टाचा पैसा होता. मात्र, अनेक ठेवीदार हे पोलिसात गेले, न्यायालयात गेले त्यांना न्याय न मिळाल्यानेने आपण कोणाकडेच दाद मागितली नाही, असेही दोघांनी सांगितले.
कोट
कोणाचे नाव कोणत्या संस्थेला आहे म्हणून त्याने भ्रष्ट्राचार केला असा त्याचा अर्थ होत नाही. १७ वर्षात जर हे ठेवीदार माझ्याकडे आले असते तर नक्कीच मदत केली असती, आताही मदत करेल. - एकनाथ खडसे, माजी मंत्री