कोरोना विषाणूने थैमान घातल्यामुळे राज्यभरात मागील वर्षी लॉकडाऊन जाहीर झाला. परिणामी, शाळा, महाविद्यालये बंद पडली़ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागले. हे नुकसान होऊ नये म्हणून राज्य सरकारने ऑनलाईन शिक्षण सुरू केले. मात्र, प्रत्यक्षात सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईन शिक्षण पोहचू शकले नाही़ परिणामी, विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित रहावे लागले. मध्यंतरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला. अन् शाळा सुरू करण्यास शासनाकडून हिरवा कंदील मिळाला. पाच ते सहा महिने घरात राहून कंटाळेल्या विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशी शाळांमध्ये कमालीची हजेरी लावून आनंद व्यक्त केला. पण, या आनंदावर पुन्हा विरजण पडले. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. दररोज शेकडो बाधित रूग्ण आढळून येत असल्यामुळे पुन्हा शाळा बंद पडल्या. परंतु, ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. दरम्यान, आजही बहुतांश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे अॅन्ड्रॉईड मोबाईल नाही़ पुन्हा त्यांच्यावर ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली. काही गावांमध्ये इंटरनेटची सुविधा व्यवस्थित नसल्यामुळे, नेटवर्कच्या प्रॉब्लेममुळे बरेच विद्यार्थी छतावर, तसेच काही झाडावर बसून जीव मुठीत घेत ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाचा दर्जा सुधारला गेला पाहिजे. टेक्नोसेव्ही शिक्षकांकडून वेगवेगळे प्रयोग करून विद्यार्थ्यापर्यंत ऑनलाईन शिक्षण पोहचविले जात आहे. या शिक्षकांचा प्रयोग जिल्हाभरात होणे अपेक्षित आहे. सध्या १५ मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालय बंद आहेत. दररोज पाचशेच्यावर बाधितांची संख्या वाढत आहे, कोरोनाचा संसर्ग पुन्हा वेगाने वाढत आहे़ त्यामुळे शाळा बंद राहण्याचा कालावधी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षण विभागाने हालचाली करणे आवश्यक आहे. लवकरच दहावी व बारावीची परीक्षाही होणार आहे. सध्या परीक्षेची पूर्वतयारी विद्यार्थ्यांकडून करून घेतली जात आहे. दुसरीकडे प्रशासनाकडून कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
पुन्हा शिक्षणापासून वंचित !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 4:29 AM