‘लोकमत’च्या वृत्तानंतर घेतली दखल : दोन ट्रॅक्टर माल केला जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाकडून शहरातील आठवडी बाजारासह मुख्य बाजारपेठ परिसरात भाजीपाला विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरीही शहरातील अनेक भागांमध्ये लपूनछपून भाजीपाल्याचा बाजार भरवला जात आहे. पिंप्राळा भागात भरणारा बाजार गेल्या दोन आठवड्यांपासून निवृत्तीनगरात भरत असल्याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर बुधवारी उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या पथकाने अचानक कारवाई करीत हा बाजार उठवून लावत दोन ट्रॅक्टर माल जप्त केला आहे.
राज्य शासनाने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतच अत्यावश्यक सुविधेच्या दुकानांना व्यवसाय करण्यास परवानगी दिली आहे. इतर कोणत्याही दुकानांना व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यानुसार बुधवारी शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरातील सर्व दुकाने व भाजीपाला विक्रेत्यांनी आपले व्यवसाय बंद ठेवले होते. मात्र सायंकाळी निवृत्तीनगर भागात अनेक भाजीपाला विक्रेत्यांनी दुकाने थाटली. तसेच या ठिकाणी भाजीपाला खरेदी करण्यासाठी नागरिकांचीदेखील मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. याबाबत स्थानिक नागरिकांनी मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिल्यानंतर थेट उपायुक्त संतोष वाहुळे हे स्वतः पथक घेऊन या ठिकाणी दाखल झाले.
मनपाचे पथक आल्यानंतर उडाली एकच धांदल
सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथक निवृत्तीनगर भागात दाखल झाल्यानंतर या ठिकाणी एकच धांदल उडाली. भाजीपाला विक्रेत्यांनी आपला माल जमा करत पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र महापालिकेच्या पथकाने सर्व विक्रेत्यांचा माल जप्त करून घेतला. या वेळी काही विक्रेत्यांचा मनपा कर्मचाऱ्यांसोबत वाददेखील झाला. त्यानंतर या ठिकाणी तालुका पोलीस स्टेशनचे पथक दाखल झाल्यामुळे विक्रेत्यांनी आपला माल तेथेच ठेवून पळ काढला.