वन विभाग सुस्त: लाकूडतोडे, वखार चालकांना नाही धाक
लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद: परिसरात निंब, भोकर, आंबा, चिंच, पिंपळ तसेच बाभळीसारख्या डेरेदार वृक्षांची सर्रास कत्तल सुरू असून, वन विभागाने त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने लाकूडतोड्यांसह वखार चालकांना कायद्याचा कोणताच धाक आता राहिलेला नाही. पर्यावरणप्रेमी नागरिकांनी त्याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
झाडे कोणाचीही व कोणतीही असो, ती तोडायची म्हटल्यास वन विभागाची रीतसर परवानगी घ्यावी लागते. विनापरवानगी झाडे तोडल्यास तो गुन्हा समजला जातो. कायद्याने संबंधिताला शिक्षासुद्धा होते. स्वत:च्या मालकीची झाडेही विनापरवानगी तोडता येत नाहीत. महाराष्ट्र शासनाने फेलिंग ट्री (रेग्युलेशन) अॅक्ट १९६४ अन्वये झाडे तोडणेबाबत कायदेशीर तरतूद केली आहे. याशिवाय महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९६६ अन्वये खासगी जागेवरील कोणत्याही झाडांना मालकी हक्क असतानासुद्धधा विनापरवानगी तोडता येत नाहीत. मात्र, झाड मृत्यू पावले असेल किंवा वादळाने पडले असेल, झाडाचा वाहतुकीला अडथळा होत असेल, याशिवाय आग, वीज, वादळी पाऊस किंवा अन्य नैसर्गिक कारणाने झाडाची नासधूस झाली असेल किंवा शेती करण्यास झाडामुळे अडथळा निर्माण होत असेल, तरच झाड तोडण्याची परवानगी वृक्ष अधिकारी देऊ शकतो. अर्थात, जेवढी झाडे तोडली जात आहेत तेवढी झाडे अन्यत्र लावण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्याकडून दिले जातात.
विनापरवानगीने झाडे तोडली, तर कायद्याने गुन्हा आहेच; परंतु ती झाडे जप्त करण्याचा अधिकार वन विभागाला आहे. केवळ झाडेच नव्हे, तर त्या तोडलेल्या झाडांपासून बनवलेल्या वस्तूदेखील कायद्याने जप्त होऊ शकतात आणि वृक्ष तोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होते. वृक्ष तोडण्याची परवानगी मागितल्यापासून साठ दिवसांत वृक्ष अधिकाऱ्याने काहीएक कळविले नाही किंवा निर्णय दिला नाही, तर त्याने परवानगी दिलेली आहे, असे समजणे ही तरतूद कायद्यात आहे. वृक्ष अधिकाऱ्याने परवानगी दिली नाही, तर ३० दिवसात जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील करण्याचा अधिकार कायद्याने दिला आहे. प्रत्यक्षात झाडे तोडणाऱ्यांकडून कोणतीच कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जात नसल्याचे दिसून येेते.
-------------------
झाडांची संख्या दिवसेंदिवस कमी
वृक्षतोडीबाबत कडक कायदा असताना अनेक वर्षे जुनी झाडे लाकूडतोडे व वखार चालकांकडून कत्तल केली जात आहेत. शेतीशिवारात झाडांची संख्या त्यामुळे दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. कोणतीच परवानगी न घेता रात्रंदिवस वृक्षतोड सुरू असतांना वन विभागानेही डोळ्यांवर कातडे ओढून घेतल्याचा आरोप होत आहे.
------------------------
फोटो-
ममुराबाद येथे वनविभागाच्या दुर्लक्षामुळे डेरेदार वृक्षांची सर्रास कत्तल सुरू असून, लाकूडतोडे व वखार चालकांनी कायदा अक्षरशः धाब्यावर बसवला आहे. (जितेंद्र पाटील)