वाढत्या कोरोना संसर्गासह गंभीर रुग्णांचे प्रमाणदेखील वाढत असल्याने जिल्ह्यात ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र मागणीच्या प्रमाणात पुरवठा होत नसल्याने रेमडेसिविरसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी फिरफिर सुरू आहे. इतकेच नव्हे या इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचा आरोप देखील होऊन साठेबाजी रोखण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला. हा कक्ष स्थापन झाला असला तरी अजूनही रुग्णांच्या नातेवाईकांची फिरफीर थांबलेली नाही. इंजेक्शन मिळविणे हे रुग्णांच्या नातेवाईकांसाठी अद्यापही नियंत्रणाबाहेर असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. कोरोनाच्या उपचारासाठी लागणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनची साठेबाजी रोखणे तसेच योग्यप्रकारे नियोजन करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयात गेल्या आठवड्यात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला. या कक्षात सप्ताहातील सातही दिवस अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. खाजगी मेडीकल, खाजगी रुग्णालय यांच्यामार्फत औषधींच्या वापरावर व या औषधींची साठेबाजी रोखणे तसेच योग्यप्रकारे नियोजन करुन सदर औषध उपलब्ध होत नसल्याबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारीच्या अनुषंगाने खाजगी मेडीकल, होलसेल डिलर्स यांच्यामार्फत औषधीच्या खरेदी व वितरण यांच्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. तसेच वाढत्या कोविड संक्रमित रुग्णांच्या संख्येमुळे रेमडेसिविरच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ झाली. यामुळे ते उपलब्ध होत नसल्याबाबत मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने त्याच्या उपलब्धतेबाबत नागरिकांना माहिती होण्यासाठी हा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला.या कक्षात सातही दिवस २४ तास अधिकारी, कर्मचारी यांची पुढील आदेश होईपावेतो नियुक्ती करण्यात आली आहे. नियंत्रण कक्ष स्थापन होण्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली तरी याठिकाणी संपर्क साधूनही उपयोग होत नसल्याच्या सुरूवातीला नागरिकांच्या तक्रारी आल्या. याशिवाय नियंत्रण कक्षामुळे रेमडेसिविर गरजू रुग्णांना उपलब्ध होईल, असे वाटत होते. मात्र अजूनही रुग्णांच्या नातेवाईकांना या इंजेक्शनसाठी फिरफिर करावीच लागत आहे. विशेष म्हणजे या इंजेक्शनसाठी लोकप्रतिनिधी अधिकारी यांच्यासह वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींशी रुग्णाचे नातेवाईक संपर्क साधतात व इंजेक्शन मिळवून द्या, अशी मागणी करतात. ही परिस्थिती अजूनही कायम आहे. त्यामुळे नियंत्रण कक्ष स्थापन झाला असला तरी फारसा उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. नियंत्रण कक्षात नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी नियंत्रण कक्षात प्राप्त होणाऱ्या तक्रारींच्या अनुषंगाने माहिती संबंधीत रुग्णालयाकडून प्राप्त करुन त्यानुसार संबंधीत अर्जदार, तक्रारदारास संबंधीत रुग्णालयाच्या डॉक्टरांना समर्पक उत्तर देवून तक्रारीचा निपटारा करावा, असे आदेश आहे. मात्र याविषयी तक्रार केली तरी व रुग्णालयाशी संपर्क झाला तरी रेमडेसिविर उपलब्ध होत नाही, अशी तक्रार कायम आहे.
नियंत्रण कक्ष स्थापना होऊनही "रेमडेसिविर" नियंत्रणाबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 4:16 AM