लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ठेवीदारांची फसवणूक झाल्याचा पुण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर झालेल्या कारवाईत जप्त केलेला दस्तऐवज व नोंदी मिळालेल्या आहेत. मात्र वेळेअभावी पोलिसांना याचा तपास करता आलेला नाही, खुद्द तपासाधिकारी यांनी न्यायालयात मान्य केलेले आहे.
अटकेतील अकरा संशयितांची पुन्हा पोलीस कोठडी घेताना तपास अधिकाऱ्यांनी हाच मुद्दा प्रामुख्याने लावून धरला. हा दस्तऐवज व नोंदी अटकेतील संशयितांना दाखवून त्याचा समक्ष तपास करायचा बाकी असून त्याला वेळ मिळू शकला नाही. दरम्यान, या गुन्ह्याची व्याप्ती आणखी वाढणार असून राज्यभर जाऊन तपास करावा लागणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. अटकेतील संशयित जळगाव, धुळे,भुसावळ, मुंबई व औरंगाबाद येथील रहिवासी आहेत त्यांनी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील ठेवी वर्ग करून घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यात पुरावे गोळा करण्यासाठी या जिल्ह्यांमध्ये जाणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार हा संगनमताने व कट पूर्वनियोजित कटाने झालेला आहे.
दरम्यान, अटकेतील संशयितांनी अनेक बाबींची कबुली दिली आहे तर काही प्रकरणांमध्ये उडवाउडवीची उत्तरे दिलेली असून जाणीवपूर्वक तपासात सहकार्याची भूमिका घेतली आहे. ठेवीदार आपल्याकडे यायचे, त्यांच्या ठेवी आपण कमी किमतीत घेतल्या, मात्र ते ठेवीदार कोण व कुठले हे आम्हाला माहिती नाही. त्यांना आपण रोख पैसे दिलेले आहेत. बनावट कागदपत्रे कोणी तयार केली हे देखील आम्हाला माहिती नाही, असे अटकेतील संशयितांनी तपासात सांगितले आहे.
सहकार विभागाचे अधिकारी रडारवर
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,या प्रकरणात राज्य व केंद्राच्या सहकार विभागातील काही अधिकाऱ्यांचीही चौकशी होणार आहे, मात्र याला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. दुसरीकडे हार्ड डिस्क अद्यापही परत न मिळाल्याने नूतन अवसायक चैतन्य नासरे यांना काम करायला अडचणींचाच सामना करावा लागत आहे.