चंदू अण्णा नगर परिसर : रस्ते नसल्याने पावसाळ्यात होतात प्रचंड हाल
जळगाव : गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती वाढलेल्या चंदू अण्णा नगर परिसरात पिण्याच्या पाण्याची समस्या अद्याप सुटलेली नाही. यामुळे नागरिकांना बोअरवेलचे पाणी वापरावे लागत आहे. येथील पाण्याच्या समस्येबाबत नागरिकांनी मनपा प्रशासन व लोकप्रतिनिधींकडे वारंवार तक्रारी केल्या. मात्र, अद्याप पिण्याच्या पाण्याची व रस्त्यांची समस्या सुटली नसल्याची खंत चंदू अण्णा नगर परिसरातील नागरिकांनी ''लोकमत''कडे व्यक्त केली.
शहरापासून काहीसा दूर, शांत आणि प्रदूषणमुक्त भाग असल्याने गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नागरी वस्ती वाढली. शिवम नगर, साई माधव पार्क आदी लहान-मोठ्या वसाहती मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्या. मात्र, आजही पिण्याच्या पाण्याची समस्या जैसे थे आहे. त्यामुळे नागरिकांना बोअरवेलचे पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे. ज्या नागरिकांकडे बोअरवेल नाही, त्या नागरिकांना बोअरवेल असलेल्या नागरिकांकडून विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. वर्षानुवर्षे अशा प्रकारचा त्रास या भागातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. तसेच या ठिकाणी रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली आहे.
बांधकाम व्यावसायिकांनी तात्पुरत्या केलेल्या रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. मातीचे रस्ते असल्याने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवर पाणी तुंबत असते. जागोजागी चिखल होत असल्याने नागरिकांना रस्त्यावरून चालणेही अवघड होऊन जात आहे. येथील नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात रस्त्याच्या समस्येचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या ठिकाणी गटारी असल्या तरी, त्यांची अनियमित स्वछता होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता निर्माण झाली असल्याचेही रहिवाशांनी सांगितले.
इन्फो :
पाच वर्षात पाण्याबाबत हजारो तक्रारी
या नागरिकांनी सांगितले की, पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्याबाबत त्यांनी अनेकवेळा मनपा प्रशासनाला निवेदने दिली, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडे तक्रारी केल्या. मनपा निवडणुकांच्या वेळीही नगरसेवकांना पाण्याची समस्या सोडविणेबाबत मागणी केली. यावेळी त्यांनी निवडणुका झाल्यानंतर ही समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. मात्र, मनपाच्या निवडणुका होऊन तीन वर्षे होत आली तरी या ठिकाणी मनपा नगरसेवकांनी पाण्याची समस्या सोडविली नसल्याचे रहिवाशांनी सांगितले.
इन्फो :
गेल्या पाच वर्षांपासून मी या ठिकाणी राहात आहे. मात्र, पिण्याच्या पाण्याची, रस्त्याची समस्या सुटलेली नाही. पाण्याची समस्या तर बिकट असून, नागरिकांना बोअरवेलचे पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे. असे असताना मनपा प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे याकडे लक्ष नाही.
- प्रवीण चव्हाण, रहिवासी
पाण्याच्या समस्येबाबत जळगाव मनपा प्रशासन व नगरसेवकांकडे अनेकदा तक्रारी केल्या. निवेदने दिली. मात्र, पिण्याच्या पाण्याची समस्या सुटलेली नाही. रहिवाशांना यामुळे बोअरवेलचे पाणी प्यावे लागत आहे. तसेच या ठिकाणी रस्त्यांचीही समस्या आहे.
- सोनाली बडगुजर, रहिवासी
पाणी टंचाईचा सर्वात मोठा त्रास महिलांना करावा लागतो. घरात पाणी नसल्यावर इतर कामेही अडून पडतात. सध्या या ठिकाणी बोअरवेल आहेत, म्हणून रहिवाशांची गरज भागत आहे. मात्र, उन्हाळ्यात बोअरवेलचे पाणी कमी झाल्यावर रहिवाशांना पाणी टंचाईचा सामना करावा लागेल. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन टाकणे गरजेचे आहे.
- वैभवी साठे, रहिवासी.
या परिसरात पिण्याच्या पाण्यासह रस्त्याच्या समस्येचा आम्हाला खूप त्रास सहन करावा लागत आहे. लोकप्रतिनिधींकडून फक्त आश्वासन दिले जाते. मात्र, अद्याप पाण्याची, रस्त्यांची समस्या सोडवलेली नाही. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता, मनपा प्रशासनाने तत्काळ या समस्या सोडवाव्यात.
-अनंत पाटील, रहिवासी