जळगाव : उड्डाण पदोन्नती प्रकरणी शासनाच्या निर्णया विरोधात सर्व कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. मात्र, सर्व कर्मचारी संपावर गेल्यावर, प्रशासनाचे कामकाज कसे चालणार, या भीतीने मनपा आयुक्तांनी शनिवारी उपोषणाची दिशा ठरविणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना मनपात चर्चेसाठी बोलाविले होते. परंतु, दोन तास चाललेल्या या चर्चेत कुठलाही तोडगा अथवा आयुक्तांनी कुठल्याही प्रकारचे समाधान कारक आश्वासन न दिल्यामुळे कर्मचारी सोमवारपासून बेमुदत उपोषणाच्या निर्णयावर ठाम राहिले आहेत. मात्र, संपात अत्यावश्यक सुविधेतील कर्मचाऱ्यांना वगळण्यात येणार आहे.
नगरपालिका असतांना १९९१ ते १९९७ दरम्यान झालेल्या कर्मचारी भरतीत नियम डावलून नियुक्ती दिल्याने, तसेच चुकीच्या पद्धतीने पदोन्नती दिल्याचा ठपका नगरविकास विभागाने ठेवला आहे. या आदेशामुळे मनपातील अनेक कर्मचाऱ्यांच्या सेेवेवर गडांंतर येणार आहे. त्यामुळे या आदेशा विरोधात मनपातील सर्व कर्मचारी एकत्र आले असून, शुक्रवारी बहिणाबाई उद्यानात बैठक घेऊन बेमुदत काम बंद उपोषणाचा निर्णय घेतला आहे.
इन्फो :
अन् आयुक्तांनी बोलाविले चर्चेला, मात्र तोडगा नाही
मनपातील सर्व कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचा इशारा दिल्यामुळे, शहरातील पाणी पुरवठा, स्वच्छता व इतर आपत्कालीन सुविधांचे कसे होणार, संपावर जाण्यापूर्वी कर्मचाऱ्यांचे नेमकी मागणी काय आहे, याबाबत आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी शनिवारी दुपारी बारा वाजता या कर्मचाऱ्यांना चर्चेसाठी त्यांच्य दालनात बोलाविले होते. या चर्चेला प्रभाग समिती अधिकारी उदय पाटील, विलास सोनवणे, सुनील भोळे, एस. एस. पाटील व इतर कर्मचारी आयुक्तांकडे गेले होते. यावेळी आयुक्तांनी सोमवार पासून बेमुदत संपात कुठले विभाग सहभागी होणार आहेत याबाबात माहिती जाणून घेतली. यावेळी उदय पाटील यांनी शहरातील अत्यावश्यक सेवा राहण्यासाठी संबंधित कर्मचारी कामावर हजर राहून, अत्यावश्यक सुविधांसाठी नागरिकांना कुठल्याही प्रकारे वेठीस धरणार नसल्याचे सांगितले. दोन तास चाललेल्या या बैठकीत कुठलाही तोडगा निघाला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आयुक्तांशी जास्त चर्चेचे गऱ्हाण न गाता, बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय ठाम असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.
इन्फो :
बैठकी दरम्यान आयुक्तांची भुमिका संदिग्ध वाटली. आयुक्तांकडून दोन तास चाललेल्या या चर्चेत समाधान कारक उत्तर मिळत नसल्यामुळे, चर्चेतुन आम्ही उठून आलो. आता उपोषणाची पुढची दिशा रविवारच्या बैठकीत ठरणार आहे. आमच्या न्याय-हक्कासाठी सत्ताधाऱ्यांसह विरोधातील नेत्यानांही भेटून आम्ही नगरविकास मंत्र्यापर्यंत पोहचणार आहोत.
उदय पाटील, प्रभाग समिती अधिकारी