लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शिवाजीनगर येथे महापालिका आयुक्तांच्या बंगल्याशेजारी असलेल्या सिगारेट तसेच बिस्किट, वेफर्स, नुडल्स या खाद्यपदार्थाच्या गोदामाला शनिवारी सायंकाळी अचानक आग लागली. या आगीत ४२ लाख रुपयांचे आटीसी, एटीडी कंपनीच्या सिगारेट व १० लाखांचे बिस्किट, वेफर्स, नुडल्स, रेडीमिक्स असे एकूण ५२ लाखांचा माल खाक झाला आहे. याप्रकरणी रविवारी पहाटे पावणे चार वाजेच्या सुमारास शहर पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अरुणकुमार लक्ष्मीनारायण जाजूू (वय ४६ रा. जैन पाईप फॅक्टरी, निमखेडी रोड) यांचे हे गोडावून आहे. या गोदामात ते सिगारेटसह खाद्यपदार्थांचा माल ठेवतात. या गोदामाला १५ मे रोजी सायंकाळी अचानक आग लागली. आगीबाबत याच परिसरात राहत असलेल्या अरुणकुमार लक्ष्मीनारायण जाजू यांच्या बहिणी निर्मला हिस माहिती मिळाली. त्यांनी आगीच्या घटनेबाबत भाऊ अरुणकुमार जाजू यांना फोनवरून कळविले. अरुणकुमार जाजू घटनास्थळी पोहचले असात, आगीत गोडावूनमधील ५२ लाखांचा माल खाक झाला आहे. याप्रकरणी अरुणकुमार जाजू यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.