जळगाव : राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी कासोदा ता. एरंडोल येथे बनावट देशी मद्यनिर्मितीचा कारखाना उद्वस्थ केला राहूल अनिल चौधरी ( रा. कासोदा) याला पथकाने अटक केली असून त्याच्याकडून पावणे चार लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.कासोदा येथे बनावट देशी मद्य तयार करून ते मालवाहू टेम्पो मधून इतर गावांमध्ये पोहोचविले जात असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक सीमा झावरे यांना मिळाली होती. त्यानुसार झावरे यांनी भरारी पथकाचे निरीक्षक एस.एफ ठेंगळे, दुय्यम निरीक्षक ए.एस.पाटील, कॉन्स्टेबल एन. पी. पाटील, ए.व्ही.गावंडे, एम.डी. पाटील, के. पी. सोनवणे व आर.पी. सोनवणे यांच्या पथकाला कारवाईच्या सूचना केल्या होत्या. या पथकाने शनिवारी सकाळी कासोदा- कनाशी रस्त्यावर नाल्याकाठी सुरु असलेला दारूचा कारखाना उध्वस्त केला.यावेळी तयार केलेले दारुचे १४ बॉक्स, लेबल्स, बूच रिकाम्या बाटल्या व टेम्पो असा ३ लाख ६९ हजार ४७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयित राहूल याला एरंडोल न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, या बनावट मद्य निर्मितीचे पाळेमुळे खणून काढण्याचे आव्हान राज्य उत्पादन विभागासमोर आहे.
कासोदा येथे बनावट देशी मद्य निर्मितीचा कारखाना उध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 6:44 PM