जळगाव : यावल तालुक्यातील डांभुर्णी येथे गावाबाहेर शेतात एका घरात सुरु असलेला बनावट विदेशी व देशी दारु निर्मितीचा कारखाना गुरुवारी पहाटेच्या सुमारास उद्ध्वस्त करण्यात आला. यात चार जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडील चारचाकी, वाहन, देशी, विदेशी बनावट दारु, बाटल्या पॅकींगचे तसेच दारु निर्मितीचे मशीन असे साडेतीन लाखांचेसाहित्य जप्त करण्यात आले आहे.विशाल काशिनाथ फालक (२९), शरद युवराज कोळी (३०), सुनील एकनाथ सोनवणे (४५) व कपील मधुकर सरोदे (४०, सर्व रा.डांभुर्णी, ता. यावल) अशी या अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यातील सरोदे हा ग्रामपंचायतीचा सदस्य आहे. मुख्य सूत्रधार जितेंद्र लालचंद सोनवणे (रा.वढोदा, ता.यावल) हा फरार झाला आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. निवडणुकीसाठी वापरण्यात येणारी बनावट देशी व विदेशी दारु डांभुर्णी येथे तयार केली जात असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक एस.एल.आढाव यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी खात्री करण्यासाठी खबऱ्यामार्फत कर्मचारी पाठविले होते. रात्री १० ते पहाटे ४ या वेळेतच दारु निर्मिती केली जात असल्याने आढाव यांनी भरारी पथकाचे निरीक्षक संजय कोल्हे, नरेंद्र दहिवडे, भरत दौंड, दुय्यम निरीक्षक जमनाजी मानेमोडे, हशमोड, कर्मचारी मुकेश पाटील, रघुनाथ सोनवणे, विजय परदेशी, अमोल पाटील, दिनकर पाटील, विपुल राजपूत, नंदू नन्नवरे व रवी जंजाळे यांचे पथक बुधवारी मध्यरात्री डांभुर्णी येथे धडकले. दारु निर्मिती होणाऱ्या घरालाच घेरुन चौघांना रंगेहाथ पकडण्यात आले. गुरुवारी पहाटे सहा वाजेपर्यंत ही कारवाई सुरु होती. याप्रकरणी विजय परदेशी यांच्या फिर्यादीवरुन पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.२७ दिवसात १०१ केसेसनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून राज्य उत्पादन शुल्क विभागाने राबविलेल्या धाडसत्रात २७ दिवसात १०१ कारवाया केल्या. त्यात २९ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून देशी, विदेशी व गावठी दारु, रसायन असा १७ लाख १५ हजार ८३१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आला आल्याची माहिती अधीक्षक आढाव यांनी दिली.
डांभुर्णी येथे बनावट दारु निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 12:31 PM