लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शहरातील काही प्रमुख मराठा नेत्यांची बैठक गुरुवारी नूतन मराठा महाविद्यालयात पार पडली. त्यात मराठा आरक्षणासाठी काम करत राहण्यासाठी जिल्हास्तरावर एक कोअर कमिटी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच पाठपुरावा करताना केंद्र सरकार आणि पंतप्रधान यांना पत्र लिहिणे, स्वाक्षरी मोहिम, सोशल मीडियावर त्याबाबत पोस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी बोलताना माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी सांगितले की, कोरोनाच्या काळात आंदोलन करताना जनतेचा विचार केला गेला पाहिजे. तसेच याबाबत जिल्हास्तरावर एक कोअर कमिटी स्थापन करावी. भविष्यात कशी वाटचाल असेल, यावरही विचार व्हावा. मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज आहे. त्यामुळे संसदेनेच त्याचा कायदा पारित करावा, अशी आग्रही मागणी असावी, असेही देवकर यांनी सांगितले.
यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर, ॲड. सचिन पाटील, संजय पवार, विनोद देशमुख, किरण साळुंखे, ॲड. सत्यजीत पाटील, नंदू पाटील, सुशील शिंदे, रवी देशमुख, ॲड. विजय पाटील, राहुल पाटील, केतन पाटील, पराग घोरपडे, पीयूष पाटील, दीपक सूर्यवंशी, योगेश पाटील, मिलिंद सोनवणे, भगवान शिंदे आदी उपस्थित होते.
सोशल मीडियात पोस्ट करण्यास सुरुवात
नूतन मराठा महाविद्यालयात पार पडलेल्या बैठकीनंतर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी लगेच ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅॅग करून आरक्षण देण्याची विनंती करण्यास सुरुवात केली. त्यात ॲड. सचिन पाटील यांनी ट्विट केले. त्यानंतर मराठा समाजाच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांनी अशा प्रकारे पोस्ट करण्यास सुरुवात केली आहे.