आज गणेश चतुर्थी (भाद्रपद शुक्ल चतुर्थी). प्रत्येकवर्षी हा उत्सव साधारणत: १०-११ दिवस साजरा केला जातो. अनंत चतुर्दशीच्या दिवशी या उत्सवाची सांगता असते, अशी मान्यता आहे की, भाद्रपद शुक्ल चतुर्थी या दिवशी भगवान गणेशाचा जन्म झाला होता. भगवान गणेश म्हणजे ज्ञान, समृद्धी व उत्तम दैव यांचे प्रतिक आहे. आज श्री गणेशाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते, त्यानंतर दररोज सकाळ-संध्याकाळ पूजा-अर्चा व आरती केली जाते. आरती झाल्यावर मोदकांचा प्रसाद दिला जातो. लोकमान्य टिळकांच्या पुढाकाराने सुरू झालेला हा गणेशोत्सव गणेश चतुर्थीपासून साजरा केला जातो.वैदीक परंपरेनुसार किंवा अध्यात्म शास्त्रांच्या मान्यतेनुसार प्रत्येक देवता म्हणजे विशिष्ट तत्व आहे. या तत्वानुसार श्री गणेश ही बुद्धीची देवता आहे. महाराष्टÑातील सर्व संतानी श्री गणेशाचे वर्णन केलेले आहे. ज्ञानियांचे राजे, योग्यांची माऊली, साधकाचा मायबाप, कैवल्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या आरंभी श्री गणेशाचे वर्णन केले आहे.देवा तुंचि गणेशु । सकलार्थमति प्रकाशु ।।म्हणे निवृत्तीदासु । अवधारिजो जी । ज्ञानेश्वरी।।श्री निवृत्तीदासांचे दास, श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे आत्मरूपा परमेश्वर ! माझ्या बोलण्याकडे लक्ष दे ! वैदीक वाङमयातील संपूर्ण अर्थाच्या ज्ञानाचा प्रकाश किंवा स्फुरण स्वरूप असा जो गणेश तो तुच आहेस. वैदीक वाङमयात ज्ञानदात्री देवता गणेश समजली जाते. सर्व देवतांच्या ठिकाणी जो काही शक्तीचा उद्बोध दिसून येतो, तो सर्व माझ्याच शक्तीचा उद्बोध आहे असे भगवतांनीच गीतेत सांगितले आहे.वैदिक परंपरेत भगवान गणेशांचे विशेष स्थान आहे. कोणत्याही प्रकारची पूजा, हवन किंवा मंगलकार्याची सुरूवात गणेशाची स्तुतीशिवाय अपूर्ण असते.गणेश वंदनाशिवाय कोणत्याही कार्याला सुरूवात होत नाही. हा उत्सव पूर्ण भारत देशात नव्हे तर संपूर्ण जगात भारतीय साजरा करतात. त्यातल्या त्यात महाराष्टÑ व मध्यप्रदेशात याची मजा काही औरच असते. या उत्सवाचे फक्त धार्मिक किंवा सांस्कृतिक महत्व नाही तर राष्टÑीय एकामत्मतेचे प्रतीक आहे. या उत्सवाची सुरूवात आजपासून सुरू झालेली आहे. या उत्सवाचा सांस्कृतिक व राष्टÑीय एकात्मतेसाठीच उगम झालेला आहे आणि त्याचं पावित्र टिकून राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावयास पाहिजे. श्री गणेशाची पूजा किंवा उत्सव साजरा करणे ही साधना आहे. याचा विसर होऊ नये आणि श्री गणेशांनी आम्हाला यासाठी शक्ती द्यावी ही प्रार्थना..!-डॉ. कैलास पाटील, पिंपळेसीम, ता.धरणगाव.
देवा तुचि गणेशु...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2019 12:35 AM